खामगाव आयटीआयमध्ये ९ व १० ऑगस्टला समुपदेशन प्रवेश फेरी; इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे
बुलढाणा,
दि. ७ (जिमाका): सतगुरू अगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव येथे
शिल्पकार प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट २०२६ प्रवेश सत्रासाठी समुपदेशन प्रवेश फेरी
आयोजित करण्यात आली आहे. संस्थेतील विविध व्यवसायांमध्ये एकूण ५९ जागा रिक्त असून इच्छुक
उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे
प्राचार्य व्ही. व्ही. काळे यांनी केले आहे.
या प्रवेश
प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी केलेले, मात्र अद्याप प्रवेश न मिळालेले सर्व उमेदवार
पात्र राहणार आहेत. उमेदवारांनी ९ व १० ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या प्रवेश खात्यातून ऑनलाइन
हजेरी नोंदविणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणी किंवा हजेरी नोंदविताना अडचण आल्यास जवळच्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधावा.
समुपदेशन
फेरीसाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात
येईल. त्यानुसार ऑनलाइन नोंदणी व हजेरी पूर्ण केलेल्या उमेदवारांनी १२ ऑगस्ट रोजी सकाळी
८ वाजता संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
गुणवत्ता
यादीनुसार रिक्त जागांवर १२ व १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमानुसार
प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. समुपदेशन फेरीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी
निर्धारित कालावधीत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून संस्थेत वेळेत उपस्थित राहावे, असे
आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment