बुलढाण्यात 1 ऑगस्टपासून स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू; व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी ऑनलाइन वेळ आरक्षित करण्याचे आवाहन

 

 


बुलढाणा, दि. 4 (जिमाका): केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार व्यावसायिक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) व त्याच्या नूतनीकरणासाठी स्वयंचलित चाचणी केंद्र (Automated Testing Station-ATS) अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा यांच्या अधिकारक्षेत्रात १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ मधील नियम ५६ नुसार सर्व व्यावसायिक वाहनांकडे वैध योग्यता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच नियम ३९ नुसार नोंदणी नसलेले अथवा आवश्यक कायदेशीर अटींची पूर्तता न केलेले वाहन रस्त्यावर चालविण्यास मनाई आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी केंद्रात एकूण तीन चाचणी ट्रॅक उपलब्ध आहेत. त्यापैकी दोन ट्रॅक ऑटोरिक्षा व कार संवर्गातील वाहनांसाठी, तर एक ट्रॅक मालवाहतूक व जड वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी वाहनधारकांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने पूर्वनियोजित वेळ (Appointment) आरक्षित करावी. नियुक्त दिवशी वाहन स्वयंचलित चाचणी केंद्र, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा येथे तपासणीसाठी सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात केंद्रातील कामकाज सुरळीत राहावे आणि व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करता यावे यासाठी दररोज तपासणीसाठी वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर तपासणीसाठी वाहनांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वाहन तपासणीसाठी येताना वाहन पूर्णपणे सुस्थितीत असावे. तसेच वाहनाची सर्व वैध कागदपत्रे, लागू असल्यास VLTD, SLD, Retro Reflective Tape यांसंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे व इतर विधिग्राह्य कागदपत्रे सोबत आणावीत, असेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारकांना आवाहन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या