विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न
बुलढाणा, दि. ११ (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी
१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम
जाहीर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष
सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रांच्या
सुसूत्रीकरणाबाबत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
घेण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित
प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात
येणार आहे. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताची नागरिक
असणे व वयाची १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर
निर्धारित संख्येपेक्षा अधिक मतदार असल्यास आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांचे विभाजन
करून नवीन मतदान केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदान
केंद्र तयार करताना शक्य तितक्या जास्त भागाचे समायोजन जवळच्या मतदान केंद्रात केल्यानंतरच
नवीन मतदान केंद्र तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना
सुसूत्रीकरण करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची माहिती देण्यात आली. पक्षांच्या प्रतिनिधींच्या
सूचना विचारात घेतल्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय
मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाचे प्रस्ताव पूर्ण करण्यात येणार आहेत.
दि. १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार
यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणामुळे मतदान
केंद्रांची झालेली वाढ, ठिकाणातील बदल तसेच नावातील बदल याबाबतची सविस्तर माहिती बैठकीदरम्यान
राजकीय पक्षांना देण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाकडून प्रस्तावित मतदान केंद्र सुसूत्रीकरणाच्या
प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर मतदान केंद्रांची अंतिम यादी निश्चित होईल. त्यानंतर
नवीन मतदान केंद्रांची पुनर्रचना अस्तित्वात येईल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर विधानसभा
मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या
सूचनेनुसार तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर
प्रसिद्ध करून सर्वसामान्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र
सुसूत्रीकरणासाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
• बीएलओ मार्फत घरोघरी भेटी : ३० जून २०२६ ते १९ जुलै २०२६
• मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण/पुनर्रचना : १७ ऑगस्ट २०२६
• प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी : २४ ऑगस्ट २०२६
• दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
२०२६
• नोटीस टप्पा/दावे व हरकती निकाली काढणे : २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर
२०२६
• मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी : २७ ऑक्टोबर २०२६
000000
Comments
Post a Comment