बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनाही कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व; अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 4 (जिमाका): महाराष्ट्र
शासनाने 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ'
या मंडळाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालक-मालकांच्या सामाजिक व आर्थिक
सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने योजनेत सुधारणा करून आता केवळ ऑटो
परवानाधारक वाहन मालकांपुरती मर्यादित असलेली योजना बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनाही
लागू केली आहे.
यापूर्वी ही योजना केवळ ऑटो
रिक्षा परवानाधारक वाहन मालकांसाठी होती. मात्र शासनाच्या सुधारित निर्णयानुसार ज्या
चालक-मालकांकडे बस, टुरिस्ट टॅक्सी किंवा ऑटो प्रवासी वाहन चालविण्याचा वैध बॅज आहे,
तेही आता या कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
या कल्याणकारी मंडळामार्फत चालक-मालकांच्या
हितासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून त्यामध्ये ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान
निधी योजना, कर्तव्यावर असताना जीवन विमा व अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्यविषयक लाभ
योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य
तसेच चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.
या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र
चालक-मालकांना मिळावा, यासाठी बस, टुरिस्ट टॅक्सी आणि ऑटो चालक-मालकांनी कल्याणकारी
मंडळाचे सभासद होण्यासाठी अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक
परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment