ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करा- जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 



           1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर

           82 हजार 627 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण

बुलढाणा, दि. 7 (जिमाका): राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत 1 लाख 16 हजार 436 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 82 हजार 627 शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाली असून 33 हजार 809 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

कर्जमुक्ती योजनाची पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 27 हजार 646 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-४९१५०८०२ वर  कार्यालयीन वेळेत संपर्क  साधावा. 

विशेष सवलत (हेअर कट) : शेतकऱ्यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, नॅशनल बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत (हेअर कट) दिली जाणार आहे. त्याची तडजोड रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी कर्जबाकीच्या ३५ टक्के, १ ऑक्टोंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ - कर्जबाकीच्या ४५ टक्के, दि. १ ऑक्टोंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ - कर्जबाकीच्या ५५ टक्के, १ ऑक्टोंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ कर्जबाकीच्या ७० टक्के आणि १ ऑक्टोंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत कर्जबाकीच्या ८५ टक्के केली जाणार आहे. सदर विशेष सवलत हे नॅशनल बँकेना लागू राहणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या