पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २९५.४७ कोटी निधी वितरित; शेतकऱ्यांना त्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा दि.7 (जिमाका): महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात आला आहे.

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील एकूण ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर ५,०२९ कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि सहकार आयुक्त दीपक तावरे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे (VC) सहभागी झाले होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात एकूण १ हजार १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८५ हजार ४५३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण केले आहे, तर अद्याप ३० हजार ०६३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे.

ज्या पात्र शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन ते त्वरित पूर्ण करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणीकरण न होऊ शकलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने जिल्हा अथवा तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मदत पुनवर्सन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.

तत्काळ खरीप पीक कर्ज वाटपाचे निर्देश:

राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल. चालू हंगामात पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी आवश्यक नियोजन पूर्ण केले असून, शेतकऱ्यांनी बँकेत अनावश्यक गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बुलढाणा जिल्हा अग्रेसर बँक व्यवस्थापक यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या