पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसानीचा पालकमंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आढावा; नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

 





बुलढाणा दि. 14 (जिमाका): अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

पालकमंत्री ना. पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, सर्व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत प्राप्त तक्रारी, शेतकऱ्यांनी सादर केलेले नुकसान कळविण्याचे अर्ज, पंचनाम्यांची सद्यस्थिती तसेच विमा नुकसानभरपाईबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त क्षेत्राची वस्तुनिष्ठ नोंद करून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीकविमा योजनेअंतर्गत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

३ लाख ३२ हजार ४९६ शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, यावर्षी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची अधिकृत विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९७ हजार शेतकऱ्यांना ७१५ कोटी २८ लाख रुपये नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. खरीप २०२५-२६ मध्ये २० हजार ३३० शेतकऱ्यांना ४ कोटी ९० लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. खरीप २०२६-२७ साठी आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ४९६ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे यांनी दिली.

६ लाख ७७ हजार बाधित शेतकऱ्यांना ४५५ कोटी ९८ लाखांची मदत

बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपये मदत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे. तसेच जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरच दिली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी दिली.

३४ हजार ८५५ लाभार्थ्यांना २९५.४७ कोटींचा निधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १ लाख १५ हजार ५१६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. पहिल्या यादीत जाहीर झालेल्या जिल्ह्यातील ३४ हजार ८५५ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २९५.४७ कोटी रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद, पंचनामे, शासकीय मदत आणि पीकविमा नुकसानभरपाईची प्रक्रिया प्रभावीपणे राबवून बाधित शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या