सुरुवातीच्या अवस्थेतच कपाशीवरील रसशोषक कीड व गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करा; कृषी विभागाचे आवाहन
बुलढाणा दि. 12 (जिमाका):
कपाशी पिकावर सुरुवातीच्या
काळात मावा, तुडतुडे व फुलकिडे या रसशोषक किडींचा, तर ऑगस्ट महिन्यात गुलाबी बोंडअळीचा
प्रादुर्भाव आढळून येतो. या किडींचे वेळीच व्यवस्थापन केल्यास कपाशीचे होणारे नुकसान
मोठ्या प्रमाणात कमी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब
करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
कोरडवाहू कपाशीमध्ये माव्याचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या-तिसऱ्या
आठवड्यापासून, तुडतुड्याचा जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि फुलकिड्यांचा ऑगस्टच्या
पहिल्या आठवड्यापासून आढळतो. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ऑगस्टमध्ये डोमकळ्यांच्या
स्वरूपात दिसून येतो.
रसशोषक किडींचे व्यवस्थापन : कपाशीमध्ये हेक्टरी २५ पिवळे चिकट सापळे
लावून पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावावर नियमित लक्ष ठेवावे. वेळेवर आंतरमशागत करून
पीक तणविरहित ठेवावे. बांधावरील अंबाडी, रानभेंडी यांसारखी पर्यायी खाद्यतणे नष्ट करावीत.
मृद परीक्षणानुसार खतांचा वापर करून अतिरिक्त नत्र खत देणे टाळावे. सीरफिड माशी, कातीन,
ढालकिडे, क्रायसोपा व अॅनॅसयीस यांसारखे नैसर्गिक मित्रकीटक पुरेशा प्रमाणात आढळल्यास
रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
मावा सरासरी १० प्रति पान, तुडतुडे २ ते ३ प्रति पान, फुलकिडे १० प्रति
पान किंवा या तिन्ही किडींची एकत्रित संख्या १० किंवा त्यापेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी
बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही २० मिली, फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड
१७.८ टक्के २.५ मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन : कपाशीची उगवण झाल्यानंतर ४० ते ४५ दिवसांनी
फेरोमोन सापळे लावावेत. एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे लावून नियमित निरीक्षण करावे.
सलग तीन दिवस सापळ्यात ८ ते १० पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
कराव्यात. मोठ्या प्रमाणावर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० फेरोमोन सापळे लावावेत.
प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे आणि जिनिंग कारखान्यांमध्ये १५ ते २० कामगंध सापळे
लावून दर आठवड्याला पतंगांचा नायनाट करावा. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून अळीसह नष्ट
कराव्यात.
उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर १५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्क
किंवा अॅझॅडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
तसेच उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री
किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकीटकांची १.५ लाख अंडी प्रति हेक्टरी
याप्रमाणे चार वेळा सोडावीत.
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी दर आठवड्याला
एकरी प्रतिनिधिक २० झाडे निवडून त्यावरील फुले, पात्या व बोंडे मोजावीत. त्यापैकी गुलाबी
बोंडअळीग्रस्त फुले, पात्या व बोंडांची टक्केवारी काढावी. प्रादुर्भाव ५ टक्क्यांपेक्षा
जास्त आढळल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली, क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही
२५ मिली, प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली, इंडोक्साकार्ब १५.८ टक्के १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन
२.८ टक्के १० मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
वरील कीटकनाशकांची मात्रा साध्या नॅपसॅक स्प्रेअरसाठी शिफारशीत असून
पॉवर स्प्रेने फवारणी करताना मात्रा तिप्पट करावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कपाशीवरील रसशोषक किडी व गुलाबी बोंडअळीचे सुरुवातीच्या अवस्थेतच प्रभावी व्यवस्थापन
करून पिकाचे नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment