धामणगाव बढे येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
धामणगाव बढे येथे समग्र
प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
‘अधिक उपचार, कमी रेफरल’
संकल्पनेतून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर भर
बुलढाणा,
दि. ३१ (जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न
गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी
करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव बढे, ता. मोताळा येथे समग्र
प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात
संपन्न झाली.
दि. २० व २१ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या
कार्यशाळेत ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ
आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसेच ‘अधिक
उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना
आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा
प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत
मंडाले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली,
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव व जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या
वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले.
विविध
आरोग्य विषयांवर मार्गदर्शन : प्रशिक्षक डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष
सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता
खाडे, सुनीता जंवजाळ आणि सुलोचना पऱ्हाड यांनी विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना
मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा, माता व
बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व
असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, निदान व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची
आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धतींचा प्रभावी वापर, आरोग्य
शिक्षण व जनजागृती तसेच समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश होता.
गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात
शिशू व बाल आरोग्य, आजारांचे लवकर निदान व उपचार, आवश्यक संदर्भ सेवा तसेच
गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन
करण्यात आले. तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून
प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात आले.
या प्रशिक्षणात जिल्हा विस्तार व माध्यम
अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर धोती, आरोग्य सहाय्यक योगेश तायडे, सुनील
लोखंडे, आरोग्य सहाय्यिका श्वेता बोरे यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य
सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक आणि इतर आरोग्य
कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
प्रत्येक कुटुंबापर्यंत
आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक,
प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देऊन
प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण, स्वच्छता, तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्ती तसेच
असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान आणि संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंधात्मक
उपाययोजनांबाबत जनजागृती वाढविण्यासाठी या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उपयोग होत आहे.
0000
Comments
Post a Comment