महाडीबीटीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू; नोंदणीला सुरुवात • महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत मंजूर करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.
6 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी
२.० प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे
अर्ज भरण्याची सुविधा दि. ६ जुलै २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी
तसेच महाविद्यालयांनी विहित कार्यपद्धतीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना,
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील
व वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजनांसाठी नवीन तसेच नूतनीकरणाचे
अर्ज स्वीकारले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी महाआयडी
(MahaID) नव्याने तयार करणे बंधनकारक असून त्यासाठी स्वतःचा आधार क्रमांक वापरणे आवश्यक
आहे. आधारवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी.
तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास दाखला, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रांची
पीडीएफ प्रत तयार ठेवून महाआयडीद्वारे लॉगिन करून अर्ज सादर करावा. अर्जाची पीडीएफ
अथवा प्रिंट जतन करून ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयांसाठीही विशेष
सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांनी केवळ प्राचार्यांच्या लॉगिनद्वारे प्रणालीचा
वापर करावा. अभ्यासक्रमनिहाय शुल्क रचना अद्ययावत करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज
कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत तपासून मंजूर करून पुढे पाठविण्याची
जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहणार आहे. तसेच अनुसूचित जातीच्या पात्र विद्यार्थ्यांकडून
प्रवेशावेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले
आहेत. महाविद्यालयांनी आपल्या संस्थेची व अभ्यासक्रमांची माहिती, शुल्क रचना आणि मान्यतेसंबंधी
तपशील संबंधित शैक्षणिक यंत्रणेमार्फत महाडीबीटी २.० पोर्टलवर अद्ययावत करून घ्यावा.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व
महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या संस्थेत प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील
पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज अनिवार्यपणे भरून घेऊन आवश्यक
कार्यवाही करावी. अन्यथा पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची
वैयक्तिक जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असा इशाराही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त
मनोज मेरत यांनी दिला आहे.
00000
Comments
Post a Comment