८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण
बुलढाणा
दि. 13 (जिमाका): भारताचा 80 वा
स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार
आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून सर्व विभागीय, जिल्हा,
उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याच्या
सूचना दिल्या आहेत. राज्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्यदिन समारंभ मंत्रालय, मुंबई येथे
सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडणार आहे. पुणे येथे
राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी
आपल्या कार्यक्षेत्रात समारंभांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित
करण्यात येणार असून राष्ट्रध्वजाला मानवंदना, राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे
गायन करण्यात येणार आहे. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, देशाची
अखंडता आणि संविधानिक मूल्ये यांवर आधारित संदेश नागरिकांना देण्यात येणार आहेत. यादिवशी
सकाळी 8.35 ते 9.35 यावेळेमध्ये इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित
करण्यात येणार नाही. ज्यांना स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल त्यांनी तो सकाळी
8.35 पूर्वी अथवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण, वाद-विवाद स्पर्धा,
निबंध, कविता, देशभक्तीपर गीत आणि भाषण स्पर्धा, तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन
करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारती तसेच
ऐतिहासिक किल्ल्यांवर राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून ध्वजारोहण व ध्वजसंहितेचे
नियम काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक,
शहीद जवानांचे कुटुंबीय, शौर्य पुरस्कार विजेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना
या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी स्वातंत्र्यदिन
समारंभ यशस्वी आणि शिस्तबद्धरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment