सोयाबीनवरील किडींच्या एकात्मिक नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी

 

सोयाबीनवरील किडींच्या एकात्मिक नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी;

 

बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : सोयाबीन पिकावरील प्रमुख किडींचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे शेताचे निरीक्षण करावे, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. सोयाबीन पिकाच्या सद्यःस्थितीत ४० ते ५० दिवसांच्या कालावधीत खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या आदी किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे किडींची लक्षणे ओळखून आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव झाल्यास योग्य नियंत्रण उपाययोजना कराव्यात.

 

सोयाबीनवरील प्रमुख किडींमध्ये खोडमाशी व चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या, केसाळ अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) यांचा समावेश आहे. खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची पाने वाळतात, खोड आतून पोखरले जाते आणि फांद्यांवर चक्री आकाराचे कपारे पडतात. पाने खाणाऱ्या अळ्या पानांना जाळीदार छिद्रे पाडून नुकसान करतात.

 

चक्री भुंगा फांदीवर दोन चक्री काप मारून त्यात अंडी घालतो. त्यामुळे कापाच्या वरचा भाग वाळून खाली गळून पडतो. केसाळ अळी पानांच्या मागच्या बाजूला राहून पाने कुरतडते, तर तंबाखूची पाने खाणारी अळी सुरुवातीला पाने खाते आणि नंतर संपूर्ण झाडाचे पर्णहीन करून शेंगांचेही नुकसान करू शकते.

 

एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर : किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करावा. मशागतीय व भौतिक उपायांमध्ये पेरणीच्या वेळी प्रति किलो बियाण्यास थायमेथोक्झाम ३० FS (१० मिली) ची बीजप्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. तसेच शेतात प्रति हेक्टरी २० ते २५ ‘T’ आकाराचे पक्षी थांबे उभारल्यास पक्षी अळ्या टिपून खातात. केसाळ अळी व तंबाखूच्या अळीची अंडीपुंज तसेच जाळीदार झालेली पाने गोळा करून नष्ट करावीत. चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसताच कापलेला भाग किंवा सुकलेली फांदी खालील भागासह तोडून नष्ट करावी.

 

जैविक नियंत्रणासाठी किडींच्या सुरुवातीच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळी अर्क (NSKE) किंवा अझाडिरॅक्टिन १५०० PPM (५० मिली प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी. तंबाखूच्या अळीसाठी SINPV (२५० LE) किंवा बॅसिलस थुरिंजिएन्सिस (Bt) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यासच आवश्यकतेनुसार रासायनिक नियंत्रणाचा अवलंब करावा. अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी टाळून शेतकऱ्यांनी पीक परिस्थितीनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या