महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू
महाडिबीटी 2.0 वर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू
विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांना ऑनलाइन अर्जासाठी सहकार्य करण्याचे
आवाहन
बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : राज्यातील
विजाभज, इतर मागासवर्ग व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७
करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महाडिबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा,
असे आवाहन करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीची
रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने
विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण
(Renewal) अर्जासाठी विद्यार्थ्यांनी नवीन महाडिबीटी आयडी/आधार लॉगिन करून अर्ज प्रक्रिया
पूर्ण करावी. आवश्यक कागदपत्रे जसे की जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र,
वैध प्रमाणपत्रे आदींच्या स्पष्ट पीडीएफ प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
महाडिबीटी 2.0 वर उपलब्ध प्रमुख योजना : मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती योजनांमध्ये विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती
योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमातील
विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तसेच खासगी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाहभत्ता, इमाव प्रवर्गातील
मुलींसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या विविध योजना तसेच विजाभज
विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप यांचा समावेश आहे.
मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजनांमध्ये इयत्ता ५ वी व ७ वी, तसेच इयत्ता ८ वी व १० वीतील इतर मागास
प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सैनिक शाळेतील प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
निर्वाह भत्ता, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती, तसेच
PM-YASASVI मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आदी योजनांचा समावेश आहे.
महाविद्यालयांची महत्त्वाची जबाबदारी
: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाडिबीटी 2.0 वर ऑनलाइन
नोंदणी व अर्ज करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. महाविद्यालयाच्या नावाने तसेच मान्यताप्राप्त
अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता आणि विविध मान्यतेची माहिती पोर्टलवर
अचूकपणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची आहे.
महाविद्यालयांनी
पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ
नये. प्रलंबित अर्जांची नियमित तपासणी करून विहित मुदतीत अर्ज मंजूर करून पुढे पाठविण्याची
जबाबदारी प्राचार्यांची राहणार आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांना
ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शिक्षण विभागाशी समन्वय साधून सहकार्य करण्याचे आवाहनही
करण्यात आले आहे.
अर्जासाठी महाडिबीटी पोर्टलचा वापर :
शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांनी
https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या
सुरुवातीस पोर्टलवर लॉगिन करून ‘नागरिकांसाठी लॉगिन’
किंवा ‘महाडीबीटीशिवाय प्रवेश करा’ या पर्यायातून
आधार आधारित लॉगिन करता येईल. आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक अद्ययावत केल्यानंतर लॉगिन
प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. लॉगिन केल्यानंतर
पात्र योजनांची यादी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेची माहिती पाहून
‘Apply’ पर्यायाद्वारे वैयक्तिक, शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज
ऑनलाइन सबमिट करावा. अर्जाची प्रिंट अथवा PDF स्वरूपात प्रत जतन करून ठेवण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
तक्रारींसाठी ऑनलाइन सुविधा : तांत्रिक किंवा
प्रशासकीय अडचणींबाबत विद्यार्थ्यांना लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची
सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाDBT हेल्पडेस्कशी ०२२-४११५०८०० / १८००१०२५३११
या क्रमांकावर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
शैक्षणिक
वर्ष २०२६-२७ करिता मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज
महाडिबीटी 2.0 प्रणालीवर भरावयाचे असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थी,
पालक तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्राचार्यांनी या प्रक्रियेस सहकार्य करून पात्र विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक
संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment