२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड
• १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह;
युवकांच्या सहभागातून जनजागृतीवर भर
• १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत
‘जलसंधारण अभियान’
• ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन
बुलढाणा
दि. 12 (जिमाका): माती आणि पाणी
ही नैसर्गिक संसाधने असून त्यांच्या संवर्धनासाठी व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. राज्यातील
नागरिक, विशेषतः युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट
रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’, तर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि १५
ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येणार असून
सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश मृद
व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
२१ ऑगस्ट “जलसंधारण दिन” आणि १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’
साजरा करणेबाबत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे
आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर,
सह सचिव पंडित जाधव, उपसचिव मृदुला देशपांडे, अवर सचिव देवेंद्र भामरे तसेच जिल्हाधिकारी
डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा जलसंधारण
अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री संजय राठोड म्हणाले, माजी मुख्यमंत्री दिवंगत
सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी
चळवळ उभी केली. जलसंधारण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा
जन्मदिवस २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मृद व जलसंधारण हे शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकासाचा पाया आहे. माती आणि पाणी ही
नैसर्गिक संसाधने परस्परांशी अवलंबून असून भविष्यातील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन
करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये याबाबतची जागरूकता वाढविण्यासाठी विविध
उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’ : २१ ऑगस्ट रोजी राज्यातील
सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ही या उपक्रमाची संकल्पना असून ‘पाणी अडवा,
पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत
प्रत्येक जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ३ किलोमीटरचा महा-वॉकथॉन आयोजित करण्यात येणार
असून त्यानंतर मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येईल. या उपक्रमात नागरिक, लोकप्रतिनिधी,
शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्रातील
प्रतिनिधी, क्रीडा संघटना तसेच युवकांचा सहभाग राहणार आहे. वयाची १५ वर्षे पूर्ण केलेले
पुरुष व महिला या वॉकथॉनमध्ये सहभागी होऊ शकतील. सहभागी नागरिकांसाठी क्यूआर कोड आधारित
ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे, असेही मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
युवकांच्या
सर्जनशीलतेला व्यासपीठ : जलसंधारण सप्ताहादरम्यान राज्यातील युवकांमध्ये मृद व जलसंधारणाबाबत
व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘Reel for Soil and Water Conservation’ ही राज्यस्तरीय
स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. १५ ते ३० वयोगटातील युवकांना या स्पर्धेत सहभागी
होता येणार असून प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावयाची
आहे. #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य राहणार आहे.
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची
धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन
आदी विषयांवर युवकांना रील तयार करता येणार आहे. रिल्स बनवितांना Storytelling,
Acting, Music, Dance, Animation, AI Creative, Comedy, Short Film, Drone Visual किंवा
नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करता येईल. या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर सन्मानचिन्हासह
प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी
१० हजार रुपये आणि प्रशस्तीप्रत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्रही
देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम : १५ ऑगस्ट
२०२६ ते २६ जानेवारी २०२७ या जलसंधारण अभियानाच्या कालावधीत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील
शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला व पोस्टर स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा,
‘एक शाळा-एक शोषखड्डा’ उपक्रम, जलमित्र/जलदूत घोषित करणे, जलसंधारणाची शपथ तसेच जलसंधारणाशी
संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये दिवंगत सुधाकरराव
नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून
मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येईल.
ग्रामीण व शहरी भागातही जलसंधारणाची कामे : अभियानाच्या
कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात मृद व जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण
व जलपूजन, शेततळे व जलस्रोतांची पाहणी, अमृत सरोवरांच्या परिसरात वृक्षारोपण, ‘हरित
महाराष्ट्र-संपन्न महाराष्ट्र’साठी वृक्षारोपण, ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान तसेच लोकसहभागातून
नाला, तलाव, विहीर व पाझर तलाव स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
“माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे.
त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी
आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जलसंपन्न आणि शाश्वत
महाराष्ट्र घडविण्यासाठी नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे
आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या
संकल्पनेतून राज्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य
संस्थांनी एकत्रितपणे जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
0000000

Comments
Post a Comment