उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

 


बुलढाणा दि. 11 (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, नागरिकांना उत्तम ग्रंथालयीन सेवा आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारदिला जातो. सन २०२५-२६ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

सन २०२५-२६ या वर्षासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातून प्रत्येकी एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्यास आणि एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचा उद्देश ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते व सेवकांना प्रोत्साहन देणे आणि समाजात वाचनाची आवड वाढविण्यास हातभार लावणे हा आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या