एचआयव्ही जनजागृतीसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण; सर्व विभागांनी समन्वयाने सक्रिय सहभाग नोंदवावा - जिल्हा शल्य चिकित्सक
बुलढाणा,
दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात
एचआयव्ही,एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी कार्यरत विविध यंत्रणांची कार्यक्षमता वाढवून
समन्वयितपणे जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे
आयोजन करण्यात येणार असून, सर्व विभागांनी एकत्रितपणे या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,
असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले.
एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत
आंतर विभागीय बैठक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी औषध व
अन्न प्रशासन सहायक आयुक्त गजानन घिरके, गटविकास अधिकारी एस.डी. तायडे, निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ. प्रविण घोंगटे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, वैद्यकीय अधिकारी
डॉ. सरोज छबीले, डॉ.डि.व्ही. खिरोडकर, एस.बी. साखळीकर, गजानन देशमुख, वैशाली इंगळे,
मंगला उमाळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या
उपचारात सातत्य, समुपदेशन आणि उपलब्ध सुविधांमुळे एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत
घट झाली असून ही समाधानाची बाब आहे. पुढील काळातही संसर्ग रोखण्यासाठी शिबिरे, समुपदेशन
तसेच युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात
आलेल्या रेड रिबन क्लबच्या माध्यमातून संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच एड्स
संसर्गाचा दर शून्यापर्यंत आणण्यासाठी सर्व विभागाने सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम
अधिकारी प्रमोद टाले यांनी दिली.
एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा,
2017 नुसार एचआयव्ही संक्रमित व्यक्तींविरुद्ध भेदभाव करणे हा कायद्याने दंडनीय अपराध
असून या कायद्याची जनसामान्यपर्यंत जनजागृती करावी. तसेच एचआयव्ही रुग्णांना उपचारास
नकार देणे, भेदभाव करणे, कलंकित करणे, अयोग्य वक्तव्य करणे अशा कोणत्याही प्रकारांवर
संबंधित व्यक्ती, संस्था किंवा रुग्णालयांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट
करण्यात आले.
0000

Comments
Post a Comment