नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 28:  जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायातींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.  कार्यक्रमानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, अशा सूचना सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले आहे.

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 28 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल इत्यादी ठिकाणी काम करणारे कामगार व कर्मचारी मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरीता भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल. तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तरी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कामगार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरीता सर्व प्रकारच्या आस्थापना धारकांनी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या