हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या गौरवशाली स्मृती सोहळ्याचे नागपूर येथे आयोजन
·
३५० वा शहिदी समागम शताब्दी वर्ष
·
जिल्ह्यातील
समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी डॅा किरण पाटील यांचे आवाहन
·
जिल्हाधिकाऱ्यांनी
घेतला नियोजनाचा आढावा
बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या
३५० व्या शहीदी समागम शताब्दी" वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई,
जि. ठाणे येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-की-चादर श्री गुरु तेग
बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती आणि शीख-सिकलीकर, बंजारा-लबाना,
मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर
येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर रोजी नांदेड येथे केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह, २४ जानेवारी रोजी नवी मुंबई येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
उपस्थितीत स्मृती सोहळा होणार आहे. या सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्यातील समाजबांधवांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर
३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त नागपूर येथे होणाऱ्या स्मृती सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी बुधवारी बैठक
घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशीव
शेलार, प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवनकुमार राठोड, क्षेत्रिय आयोजन समितीचे सदस्य
नानकसिंग जाट, डॅा. प्रशांत राठोड, जगन्नाथ झाडे, जवानसिंग नाईक व समाजबांधव उपस्थित
होते.
याबैठकीत जिल्हाधिकारी डॅा. पाटील
यांनी स्मृती सोहळ्याच्या अनुषंगाने समाजबांधवांसमवेत चर्चा करुन नियोजनाचा आढावा घेतला.
तसेच जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजन व सोयीसुविधांविषयी
माहिती दिली. यासोबतच हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू
आहेत. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना
सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम
वर्षा निमित्त नागपूर येथे हा स्मृती सोहळा होणार आहे. या सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्यातील
शीख-सिकलीकर, बंजारा-लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाजातील बांधवांनी मोठ्याप्रमाणात
उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
“श्री गुरू तेग बहादूर हे आमचे दैवत
आहेत. त्यांनी समाजाला दिलेली शिकवण आणि त्यांच्या नीती मूल्यांचा संदेश सर्वांपर्यंत
पोहचवणेयासाठी हा सोहळा होत आहे. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त होऊ
घातलेल्या या स्मृती सोहळ्याला सर्व समाजबांधवांनी
उपस्थित राहावे,” - नानकसिंग जाट, सदस्य क्षेत्रिय
समिती
“श्री गुरू तेग बहादूर आणि बंजारा
समाजाचा ऐतिहासिक संबंध आहे. यात लखीशाह बंजारा यांनी मोठे योगदान दिले आहे. हिंद दी
चादर श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त होणाऱ्या सोहळ्यात
जिल्ह्यातील बंजारा समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवावा”- डॅा. प्रशांत राठोड, सदस्य क्षेत्रिय
समिती
०००००

Comments
Post a Comment