बुलढाणा सामाजिक न्याय भवनात संविधान दिन उत्साहात साजरा
बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय
तसेच इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात
साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात
आले. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त
एम.एम. मेरत, इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालयाचे दिपाली पाडवी यांच्यासह सर्व शासकीय,
निमशासकीय आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त आपले मनोगत
व्यक्त करताना दिपाली पाडवी यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांची जाण व जपणूक करण्याचे
आवाहन केले. यावेळी एम.एम. मेरत यांनी भारतीय संविधानाच्या 75 वर्षपूर्ती निमित्त राबविण्यात
येणाऱ्या संविधान अमृत महोत्सव उपक्रमाची माहिती दिली. घर घर संविधान या मोहिमेअंतर्गत
26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
समाज कल्याण विभागातील कर्मचारी वर्गाने घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले.
तसेच समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त
अनुसूचित जाती मुलांचे/मुलींचे शासकीय निवासी शाळा आणि मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांमध्येही
संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक,
गृहपाल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे
सामूहिक वाचन करून संविधानातील मूल्यांची पुनःप्रेरणा घेतली.
00000
Comments
Post a Comment