शेतकरी, शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा संपन्न; ऊस लागवड व व्यवस्थापनावर मार्गदर्शन
बुलढाणा, (जिमाका) दि. 26 : कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाच्या
वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ मंचाची 34 वी सभा मौजे सातगाव म्हसला, ता. बुलढाणा येथे राजूभाऊ
उर्फ अवचीतराव पालकर यांच्या शेतात आयोजित करण्यात आले. यावेळी कृषी शास्त्रज्ञ व तज्ज्ञांनी
ऊस लागवड व व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला पैनगंगा
साखर कारखाना, वरुड (धाड)चे अध्यक्ष अनिल गुंजाळ, व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हस्के,
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अमोल झापे, डॉ. भारती
तिजारे (विषय विशेषज्ञ कृषि विद्या), प्रवीण देशपांडे (विषय विशेषज्ञ किटकशास्त्र),
डॉ. जगदीश वाडकर (विषय विशेषज्ञ विस्तार शिक्षण), मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ञ),
डॉ. दिनेश कानवडे (प्रमुख, कृषि संशोधन केंद्र), डॉ. आशुतोष लाटकर (कृषि शास्त्रज्ञ),
मनोजकुमार ढगे (जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी) तसेच कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी,
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विजय भुतेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
राजूभाऊ पालकर यांनी प्रास्ताविकातून
ऊस लागवड ही फायदेशीर शेती असल्याचे सांगून शेतकरी, शास्त्रज्ञ मंचाची भूमिका स्पष्ट
केली. यानंतर डॉ. भारती तिजारे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन व ओलित पद्धतींबाबत
मार्गदर्शन केले. प्रवीण देशपांडे यांनी ऊसावरील प्रमुख किडींची ओळख व नियंत्रण उपायांची
माहिती दिली. डॉ. आशुतोष लाटकर यांनी ऊस रोपवाटिकेचे महत्व व लागवडीसाठी सुधारित पद्धतींचे
मार्गदर्शन केले.
अनिल गुंजाळ यांनी शेती
व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ऊस लागवड क्षेत्रवाढ आवश्यक असल्याचे सांगत शेती
संलग्न व्यवसाय करण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे
यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन ऊस पिकाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून
पाहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
सभेनंतर शेतकरी व शास्त्रज्ञ
यांच्यात ऊस लागवड व व्यवस्थापन विषयक सविस्तर चर्चासत्र झाले. त्यानंतर उपस्थितांनी
राजूभाऊ पालकर यांच्या ऊस प्रक्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी हवामान तज्ञ मनेश यदुलवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी राजूभाऊ पालकर तसेच सातगाव म्हसला ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.



Comments
Post a Comment