कुऱ्हा गावात कुष्ठरोग शोध मोहीम: 723 नागरिकांची केली तपासणी

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 25 : कुष्ठरोग निर्मूलनाच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागातर्फे आज मौजे कुऱ्हा येथे एलसीडीसी अंतर्गत विशेष कुष्ठरोग शोध मोहीम व सर्व्हेक्षण राबविण्यात आले. यावेळी कुऱ्हा गावातील 723 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून तपासणीदरम्यान कुष्ठरोगाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम पार पडला. तालुका नोडल अधिकारी डॉ. अमित भामरटकर आणि अवैद्यकीय सहाय्यक पी. एस. ढोण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पथकाच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत कुष्ठरोगाविषयी जागरूकता, प्रारंभिक लक्षणे आणि लवकर निदानाचे महत्त्व याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

मोताळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा गावात एकूण 6 आरोग्य पथकाद्वारे 145 घरांतील 723 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 8 जणांमध्ये त्वचेवरील विविध प्रकारच्या तक्रारी आढळल्या असून त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ. के. व्ही. राठोड यांनी केली. तपासणीदरम्यान कुष्ठरोगाचा एकही नवीन रुग्ण आढळून न आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली.

तपासणीनंतर पथकांची आढावा बैठक घेण्यात आली. तपासणीदरम्यान आढळलेल्या उणीवांवर चर्चा करून आगामी सर्व्हेक्षण अधिक प्रभावी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर घोती, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन रावत, डॉ. अक्रम सय्यद, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, सेविका व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

कुष्ठरोग शोध मोहीम दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविली जाणार असून घराघरात येणाऱ्या आरोग्य पथकाकडून प्रत्येक नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या