व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 12 (जिमाका): राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच क्रीडा संघटना यांना बंदीस्त व्यायाम साहित्य, खुले व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्य मिळविण्यासाठी प्रस्ताव दि. 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस. महानकर यांनी केले आहे.

 

या योजनेअंतर्गत खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, आश्रम शाळा, वस्तीगृहे, क्रीडा मंडळे, युवक व महिला मंडळे, पोलीस विभाग स्पोर्ट्स क्लब, ऑफिसर्स क्लब, शासकीय महाविद्यालये इत्यादी संस्था अनुदानासाठी पात्र असतील.

 

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करून जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांच्या शिफारशीसह संबंधित प्रस्ताव पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे पाठविण्यात येतील. संचालनालयात मंजुरीनंतर राज्य क्रीडा विकास निधी सहनियंत्रण समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर मंजूर संस्थांना अनुदान वितरित करण्यात येईल.

 

अटी व कागदपत्रे: व्यायामशाळेचे किमान क्षेत्रफळ 500 चौ.फूट, तसेच प्रसाधनगृह व कार्यालय असणे बंधनकारक, संस्थेच्या नावावर किमान 30 वर्षांचा नोंदणीकृत करार किंवा मालकी हक्काची जागा असणे आवश्यक, खुले व्यायाम साहित्याकरिता किमान 1000 चौ.फूट जागा, कुंपण व गेटसह असावी. प्रस्तावासोबत संस्थेचा ठराव, घटनेची प्रत, संचालक मंडळ नोंदणी प्रमाणपत्र (1860/1950), जागेचे कागदपत्र व जीपीएस फोटो, हमीपत्र, साहित्य यादी, कव्हरिंग लेटर इत्यादी कागदपत्रे जोडावीत.

 

अर्जाचा विहित नमुना दि. 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यालयात उपलब्ध असून प्रस्ताव सादरीकरण दि. 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.  उशीरा प्राप्त प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही, तसेच वरिष्ठ स्तरावरून मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता संबंधित संस्थांवर बंधनकारक राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या