11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर , 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल
मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा
हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
Ø आदर्श आचारसंहिता लागू
Ø 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा
हक्क
Ø नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे
लागणार
Ø 141 प्रभागातून 286 सदस्य निवडले
जाणार;145स्त्रीयांसाठी राखीव
Ø दुबार नाव असलेल्या मतदारांना
एकाच ठिकाणी मतदान करता येणार
Ø आचारसंहितेसाठी 1950/1077 हेल्पलाईन
नंबर जारी
बुलढाणा, दि.
06 (जिमाका) : राज्य
निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी
सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकूण
11 नगरपरिषद त्यापैकी 7 ब वर्ग व 4 क वर्ग नगरपरिषेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार
आहे. ही निवडणूक चांगल्या व उत्कृष्ट पध्दतीने पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे पालन करावे
तसेच मतदारांनी कोणत्याही प्रलोभन व दबावाला बळी न पडता आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
राज्य
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या
अनुषंगाने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात
आली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार
शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन
प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी
करण्याची तारीख दि. 6 नोव्हेंबर 2025. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर
नामनिर्देशपत्र भरण्यासाठी उपलब्ध असण्याचा कालावधी 10 ते 17 नोव्हेंबर 2025 दुपारी
3 वाजेपर्यंत राहणार आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात
येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची
यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर 2025, अपिल नसल्यास नामनिर्देशनपत्रे मागे
घेण्याचा कालावधी दिनांक 19 ते 21 नोव्हेंबर 2025 असा राहणार आहे. अपील असल्यास दि.
21 ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी
प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत, जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता
येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन
घेण्यासाठी प्रयत्न करतील.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह नेमून
देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार
आहे. मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी असून मतदाररांना मतदानाचा हक्क बजावता येणार
आहे. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर
करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 डिसेंबरपूर्वी शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यात
येईल.
जिल्ह्यातील
11 नगरपरिषदांच्या सार्वत्रित निवडणूकीत 2 लाख 42 हजार 108 पुरुष आणि 2 लाख 34 हजार
726 स्त्रीया आणि 21 इतर असे एकूण 4 लाख 76 हजार 855 मतदार आहेत. या निवडणूकीत एकूण
141 प्रभाग संख्या राहणार असून त्यातून 286 सदस्य निवडले जाणार आहे. त्यापैकी 145 सदस्य
पदाच्या जागा स्त्रियांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
नामनिर्देशनपत्र ऑनलाईन दाखल करावे लागणार
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकातील उमेदवारांना
नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले
आहे. त्यावर नोंदणी करुन नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र
दाखल करता येणार आहे. एका नोंदणीव्दारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्रे
दाखल करता येऊ शकणार आहे. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर
त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करुन ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक
निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहणार आहे. नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक
निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्विकारले जाणार आहे.
उमेदवारांनी
नामनिर्देशन सादर करताना दाखल करावयाची कागदपत्रे या संदर्भात सविस्तर माहिती जिल्ह्याच्या
buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी उमेदवाराने निवडणुकांमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा
निश्चित करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिलेल्या खर्चाची मर्यादा
पाळण्याबाबत सर्व राजकीय पक्ष व उमेदवार यांना आवाहन करण्यात आले आहे.
या खर्च
मर्यादेनुसार अ वर्ग नगर परिषद क्षेत्रात थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी खर्च
मर्यादा 15 लक्ष रुपये, सदस्य पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा 5 लाख रुपये, ब वर्ग
नगरपरिषद क्षेत्रातील थेट नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा 11 लाख 25 हजार रुपये, सदस्य
खर्च मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये, क वर्ग नगरपरिषद क्षेत्रातील थेट नगराध्यक्ष पदासाठी
खर्च मर्यादा 7 लाख 50 हजार रुपये, सदस्य खर्च मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये, तसेच नगर
पंचायत क्षेत्रातील थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा 6 लाख, आणि सदस्य
पदाच्या उमेदवारासाठी खर्च मर्यादा 2 लाख 25 हजार रुपयापर्यंत निश्चित करण्यात आले
आहे.
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना
जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतू, जातवैधता प्रमाणपत्र
उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत
सादर करण्याची मुभा देण्याची शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र,
असा उमेदवार निवडणू आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्याच्या
आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची निवड भूतलक्षी प्रभावाने
रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे.
मतदारांसाठी संकेतस्थळ
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदाराला
मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in हे संकेतस्थळ विकसित केले
आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच नाव शोधता येणार आहे. संकेतस्थळावरील
Search Name in Voter List यावर क्लिक करुन नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करुन
मतदार यादीतील आपले नाव शोधता येणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर
मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येणार आहे.
मतदारांसाठी नवीन मोबाईल ॲप
मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ
व्हावे यासाठी नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदारांना
आपल्या नावाबरोबरच आपले मतदार केंद्रदेखील शोधता येणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत
शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी,
शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती समजू शकणार आहे. ही माहितीसुध्दा या ॲपमधून मिळणार आहे.
एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित
नगरपरिषदेच्या निवडणुका बहुसदस्यी पध्दती असून
एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकुण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या
नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्ष पदासाठी देखील मतदान
होत असल्याने साधारणत: एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका
नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी 20 ते 75 पर्यंत असते.
मतदार जागृती
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकमध्ये मतदानाचे
प्रमाण वाढविण्यासाठी मोठया प्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश संबंधित नगरपरिषदा
व नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदार जागृती संदर्भातील
सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण
उपक्रम सूचल्यास तेही राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील
संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या
मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येणार आहे. या आवाहनाला
प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे,
याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र
वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद
न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून
त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे
विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख
पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावरील सुविधा
मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्याबाळासह
असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आदीना प्राधान्याने मतदान करून
दिले जाणार आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची
व्यवस्था नसल्यास तात्पुर्ती सुविधा उभारली जाणार आहे. व्हिलचेअरचीही व्यवस्था राहणार
आहे. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची
व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे
आवश्यक असेल; परंतु शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे.
महिलांसाठी पिंक मतदान केंद्र
महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी
सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असलेले मतदान केंद्र 'पिंक
मतदान केंद्र' म्हणून ओळखले जाणार आहे. मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी
नेण्यास बंदी करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या
बाहेर मतदारांना मोबाईल दूरध्वनी जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष सुरु करण्यात येणार
आहे.
मनुष्यबळाची व्यवस्था
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या या निवडणुकांसाठी
11 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 22 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून
त्याची पूर्तता करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांची
उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये
प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या
कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या
मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे
शासनाला नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता
येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची
आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने
दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहे.
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले आहे. त्याचा हेल्पलाईन नंबर
1950/1077/242683 हा आहे व तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निवडणूकांच्या प्रयोजनार्थ
प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश जारी केले असून त्यानुसार जिल्हास्तरीय
माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. उमेदवारांना जाहिरात प्रमाणनासाठी या समितीकडे अर्ज
करता येणार आहे. जिल्ह्यातील मुद्रीत व समाजमाध्यमांनी आदर्श आचारसंहितेचे प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी
केले.
या पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक)
सुहासीनी गोणेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, प्र.जिल्हा माहिती अधिकारी
पवन राठोड व पत्रकार उपस्थित होते.
00000





Comments
Post a Comment