शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला • बुलढाण्यात 18 केंद्रांवर 11 हजार 283 परीक्षार्थी • परिक्षेसाठी प्रशासन सज्ज
बुलढाणा, दि. 20 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील
18 परीक्षा केंद्रांवर 11 हजार 283 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. परिक्षेसाठी प्रशासन
सज्ज असून शांततापूर्ण, पारदर्शक आणि आदर्श संचालन प्रक्रियेनुसार परीक्षा पार पाडण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.
परीक्षेसाठी पेपर-1 साठी 5 हजार 308
तर पेपर 2 साठी 5 हजार 975 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर
सीसीटीव्हीच्या माध्यमातून काटेकोर निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गैरप्रकारांना
आळा घालण्यासाठी प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टरद्वारे फ्रिस्कींग करण्यात येणार
असून मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सक्त बंदी राहणार
आहे.
परीक्षार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे नोंदवली
जाणार असून, तांत्रिक कारणांसाठी पर्यायी प्रक्रिया केंद्र संचालकांच्या देखरेखीखाली
राबवली जाईल. मुळ उमेदवाराऐवजी दुसऱ्या व्यक्तीने परीक्षेत प्रवेश केल्याचे आढळल्यास
संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
एकाच उमेदवाराने विविध केंद्रांवर अनेक अर्ज भरल्यास त्याची पूर्वतपासणी पूर्ण
करण्यात आली आहे. राज्यातील सर्व परीक्षा केंद्रे परीक्षा परिषद आणि संनियंत्रण कक्षाशी
हॉटलाइनद्वारे जोडण्यात आली आहेत. संपूर्ण परीक्षेच्या कालावधीत जिल्हा व राज्य पातळीवरून
सीसीटीव्हीद्वारे थेट निगरानी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, परीक्षेसंबंधी कोणत्याही अफवा अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता
फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुचनांचेच अनुसरण
करावे, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे. परीक्षापूर्वी परीक्षार्थ्यास कोणतीही
अडचण उद्भवल्यास जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या प्राथमिक शिक्षण विभागात स्थापन करण्यात
आलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी
कळविले आहे.
Comments
Post a Comment