रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, दि. 24 (जिमाका):  जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडुन त्यांच्या शेतांमध्ये विविध प्रयोग करतात. त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी रब्बी हंगाम 2025 पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एम.डी. ढगे यांनी केले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि इतर शेतकऱ्यांनाही त्यातून मार्गदर्शन मिळेल असा या योजनेचा उद्देश आहे. दिनांक 20 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम 2025 मध्ये बुलढाणा जिल्ह्याकरीता ज्वारी, गहु, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पात्रता : स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी शेतकरी स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली जवळपास अर्धा हेक्टर जमीन (40 आर) क्षेत्रावर सलग लागवड करणे आवश्यक आहे. पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आहे. पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा व 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

पिक स्पर्धामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे त्या स्तरावरील त्या क्रमांकाच्या खालचा स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धकास त्याच पिकासाठी पुढील पाच वर्ष स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही तथापि विजेता स्तरावरील त्या क्रमांकाच्या वरील स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षिसासाठी पात्र राहील.

बक्षिसाचे स्वरुप : स्पर्धेत विजयी झालेल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कारही दिले जातील. याअंतर्गत सर्वसाधारण व आदिवासी गट तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रुपये, दुसरे- 3 हजार रुपये व तिसरे बक्षिस 2 हजार रुपये असे असेल, तर जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रुपये, दुसरे- 7 हजार रुपये व तिसरे बक्षिस 5 हजार रुपये आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे- 40 हजार रुपये व तिसरे बक्षिस 30 हजार रुपये आहे.

रब्बी हंगामातील ठरवलेल्या पाच पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता पिकस्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिणींनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय तंत्र अधिकारी अजय वाढे यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या