जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम; कुष्ठरोगमुक्त बुलढाण्यासाठी सहकार्य करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 


 

बुलढाणा, दि. 12 (जिमाका):  जिल्ह्यात एलसीडीसी कुष्ठरोग शोध मोहीम दि. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वेच्छेने तपासणी करून घ्यावी आणि कुष्ठरोग मुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

 

कुष्ठरोग शोध मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. हरी पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. के. व्ही. राठोड, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, बाह्यरुग्ण विभाग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आणि इतर समिती सदस्य उपस्थित होते.

 

मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1836 पथकांमार्फत एकूण 23 लक्ष 75 हजार 256 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, घराघरात येणाऱ्या आरोग्य पथकांमार्फत कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

बैठकीत आरोग्य शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे बुलढाणा जिल्हा कुष्ठमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच, शासनाच्या गॅझेटनुसार कुष्ठरोग हा "नोटीफायबल" आजार घोषित असल्याने सर्व कुष्ठ रुग्णांची नोंद शासकीय दवाखान्यात करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सात दिवसांच्या आत संबंधित रुग्णांची नोंद नजीकच्या सरकारी दवाखान्यात करावी, असा सूचना देण्यात आल्या.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या