नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

 


बुलढाणा,दि.28: जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी दि. 2 डिसेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य असले, तरी यंदा मतदारांना मतदानाच्या दिवशी 12 प्रकारच्या पर्यायी ओळखपत्राद्वारे मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्र नसल्यास मतदारांनी मतदानासाठी जातांना 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मतदानासाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य असले, तरी अनेक मतदारांकडे मतदान कार्ड नसल्याचे आढळून येते. यामुळे मतदानाच्या दिवशी होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 12 प्रकारची पर्यायी फोटोसहित ओळखपत्रे वैध ठरवली आहेत. यात भारताचा पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेली ओळखपत्रे, राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील फोटो असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड), निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ., लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, आधार कार्ड ही 12 ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मतदार ओळखपत्र हरवले किंवा उपलब्ध नसले तरी कोणताही मतदार वंचित राहू नये, म्हणून 12 पर्यायी ओळखपत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान हा लोकशाहीचा सण आहे. मतदारांनी 12 पैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र घेऊन मतदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या