गुरुवारी(दि.6)जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन
बुलढाणा,
(जिमाका) दि. 4 : युवकांचा सर्वागिण विकास
व्हावा, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे
व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावे यासाठी युवा कार्यक्रम, खेळ मंत्रालय यांच्या संयुक्त
विद्यमाने दरवर्षी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2025-2026 वर्षांतील
जिल्हास्तर युवा महोत्सव गुरुवार दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा
येथील बहुद्देशिल हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी
बी.एस. महानकर यांनी दिली आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवांत संकल्पना आधारीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम
(यात समुह लोकनृत्य, समुह लोकगीत) कौशल्य विकास कार्यक्रम (यात कथालेखन, चित्रकला वकृत्व,
कवितालेखन), विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तर युवा
महोत्सवांत प्राविण्य प्राप्त केलेला संघ, युवा कलाकार यांना त्यांनी प्राविण्य प्राप्त
केल्यानुसार विभागस्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. त्यानुसार विभागावर प्राविण्य
प्राप्त झाल्यास राज्यस्तरावर व राज्यस्तरावरुन प्राविण्य प्राप्त केल्यास राष्ट्रीय
युवा महोत्सवांत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. तसेच प्रत्येक स्तरावर प्राविण्य
प्राप्त झाल्यास शासना कडुन प्राविण्य प्राप्त युवा कलाकार युवा संघ यांना रोख पारितोषिक,
प्रमाणपत्र, मोमेन्टो देण्यात येईल.
युवा महोत्सवांत 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभागी होवु शकतील(दि.12
जानेवारी 2026 या दिनांक रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी), जन्म तारखेबाबत सबळ पुरावा
म्हणुन जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या अधिपत्याखालील महाविद्यालय/विद्यालय/मंडळ
यांना जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होण्याकरीता आपल्या स्तरावरुन अवगत करुन
15 ते 29 वयोगटातील युवक व युवती यांना सहभागी होण्याबाबत आदेशित करुन सोबत जोडलेल्या
विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज व ओळखपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे
किंवा dsobld@gmail.com या मेलवर जमा करावी. अधिक माहीतीसाठी क्रीडा अधिकारी आर.आर.
धारपवार (99701 18797) यांच्याशी संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment