समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर
बुलढाणा, दि. 21 (जिमाका): समाज
कल्याण कार्यालयामार्फत आज बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे शासकीय वसतीगृहात तृतीयपंथीय स्मृतीदिन
उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समान हक्क, संवेदनशील व सन्मानावर भर देण्यात आला.
दि. 20 नोव्हेंबर 2005 रोजी तृतीयपंथीय समुदायाला
भेडसावणाऱ्या अन्याय, भेदभाव आणि हिंसाचाराच्या विरोधात नोंद झालेल्या घटनांच्या स्मरणार्थ
हा दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा अधिकृत कार्यक्रम
आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमातील
प्रमुख पाहुणे बाल कल्याण समिती सदस्य अधिवक्ता अनुराधा वावगे यांनी तृतीयपंथीयांसाठी
उपलब्ध कायदे, दस्तऐवजांमध्ये होणारे बदल, शिक्षण, आरोग्य, आर्थिक मदत आणि इतर कल्याणकारी
योजनांची माहिती तपशीलवार दिली. मॉडेल डिग्री
कॉलेज प्राचार्य व बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. डांगे यांनी 18 वर्षाखालील तृतीयपंथीय
बालकांचाही "बाल" या श्रेणीत समावेश असल्याचे सांगून अशा बालकांसाठी उपलब्ध
शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तृतीयपंथीयांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन
कायम पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक समाजकल्याण निरीक्षक गीता केदार यांनी केले. त्यांनी तृतीयपंथीय हक्क अधिनियम
2019 मधील प्रमुख कायदेशीर तरतुदी, हक्क संरक्षण, शासनाच्या जबाबदाऱ्या आणि तृतीयपंथीयांना
मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. समाजातील भेदभाव, अपमानास्पद वर्तन, तसेच
तृतीयपंथीयांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींचा विशेष उल्लेख करून समाजमान्यता आणि समान
संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमात
तृतीयपंथीय प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीचे
सदस्य सनावर कुरेशी यांनी शासनाने दिलेल्या संधीबद्दल आभार मानले. अमरसिंग राठोड (आम्रपाली)
यांनी समाजाकडून मिळणाऱ्या भेदभावपूर्ण वागणुकीचे अनुभव सांगत, आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात
साजरा होत असल्याने मिळालेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त केले. मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी रोशन गवई यांनी सर्व नागरिकांना समान हक्क व अधिकार
आहेत, तृतीयपंथीयही त्याला अपवाद नाहीत, मानवता हाच खरा धर्म असल्याचे सांगत संवेदनशीलतेचे
आवाहन केले.
कार्यक्रमामध्ये
पोस्टर डिझाईनिंग स्पर्धा घेण्यांत आली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. पुजा शिंगने,
व्दितीय क्रमांक स्नेहल तायडे व तृतीय क्रमांक शितल अनिल माने या यशस्वी उमेदवारांना
बक्षिसे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय
मुलींचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी पुजा शिगंणे यांनी केले.
0000

Comments
Post a Comment