रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे
बुलढाणा, (जिमाका) दि. 27: जिल्ह्यात
2 मोठे, 7 मध्यम व 42 ल.पा प्रकल्पांमध्ये 374.59 म्हणजे 97.57 टक्के उपयुक्त पाणी
साठा उपलब्ध झालेला आहे. बिगर सिंचन आरक्षण बाष्पीभवन व इतर व्यय वगळून उर्वरित पाणी
साठ्यावर रब्बी हंगाम 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पाणीपट्टीची
थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज नमुना 7 मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत शाखा कार्यालयात सादर
करावयाचे आहे.
अर्जाचे
कोरे नमुने शाखाधिकाारी कार्यालयात विना:शुल्क उपलब्ध आहे. मागणी अर्ज करणारे हे स्वत:
शेतीचे मालक असले पाहिजे व अर्जावर मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे. मागणी अर्जाची पुर्तता करण्याकरीता कालवा निरीक्षक
अथवा बिट प्रमुख यांचे सहकार्य घ्यावे. पाणी
अर्जावर ओलीत कराची थकबाकी आहे अथवा नाही, याबाबत नोंद करणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा
रब्बी हंगाम 31 मार्च 2026 पर्यंत राहील. प्रकल्पावरील पाणीसाठा व पिकनियोजनानुसार
पाणी पाळ्या देण्यात येतील. 1 एप्रिल 2026 नंतर उन्हाळी हंगाम सुरू होईल.
अनधिकृत
पाणी वापर, मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त ओलीत, पाणी नाश व कालव्याला नुकसान पोहोचविणे
ही कृत्ये दंडनीय आहे. बिनअर्जी किंवा बिगरपाळी पाणी घेणे दखलपात्र गुन्हा असून अशा
प्रकरणात अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे. मिश्र पिकांसाठी पाणी मागणी केल्यास जास्त
दर असलेल्या पिकाचा दर लागू होणार आहे. मंजूर क्षेत्र व प्रत्यक्ष मोजणी यापैकी अधिक
क्षेत्रावर आकारणी होणार असून, मोजणीच्या वेळी कास्तकाराने हजर राहून मोजणी टिप्पणी
पुस्तकात सही करणे बंधनकारक आहे. मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्रावर ओलीत आढळल्यास अतिरिक्त
दंड आकारला जाणार आहे.
पाण्याची
पाळी, पास व पाणी सोडण्याच्या तारखा यासंबंधी माहिती शाखा कार्यालय, ग्रामपंचायत, बिट
प्रमुख आणि कालवा निरीक्षकांकडे उपलब्ध राहणार आहे. पाण्याबाबत अडचण आल्यास शाखाधिकारी
किंवा सिंचन समितीकडे त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उशिरा आलेले
पाणी मागणी अर्ज विचारात घेतले जाणार नसून मंजूर क्षेत्रातच ओलीत करणे बंधनकारक आहे.
मंजूर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र ओलीत केल्यास पोकळ आकारणी लागू शकते, याबाबत विभागाने
विशेष सूचना केली आहे.
रब्बी
हंगामात अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणून धान्य उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी
काटकसरीने पाणी वापरावे, परस्पर सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन बुलढाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment