पुरुष नसबंदी पंधरवडा: बुलढाण्यात आरोग्य विभागाची जनजागृती मोहीम
बुलढाणा, (जिमाका) दि. 28: सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत
राज्यात दरवर्षी राबविण्यात येणारा पुरुष नसबंदी पंधरवडा यंदा बुलढाणा जिल्ह्यात
21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत विशेष उपक्रमांसह राबविण्यात येत आहे. जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर,
एएनएम तसेच मेडिकल ऑफिसर्स यांच्या माध्यमातून घराघरांत जाऊन पुरुष नसबंदीबाबत जनजागृती
केली जात आहे.
डॉ. गिते यांनी सांगितले
की, कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज बनली आहे. पुरुष नसबंदी ही
सोपी, सुरक्षित आणि प्रभावी प्रक्रिया असून याबाबतच्या गैरसमजांना दूर करण्यासाठी आरोग्य
यंत्रणा सातत्याने काम करत आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक
आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी
शस्त्रक्रिया नियोजित पद्धतीने करण्यात येत आहेत. गावांतील बैठका, दैनंदिन भेटी, मेळावे,
युवक मंडळांच्या माध्यमातूनही माहिती देण्यावर भर दिला जात आहे.
पुरुष नसबंदीचे फायदे
: प्रक्रिया अत्यंत सोपी व पूर्णपणे सुरक्षित, कामधंद्यावर कोणताही विपरीत परिणाम नाही,
लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही,
स्त्री नसबंदीपेक्षा अधिक सोपी, कमी धोका व जलद रिकव्हरी, लाभार्थ्यांना 1 हजार
450 रुपये आर्थिक प्रोत्साहन.
पुरुष नसबंदी ही महिलांवरील
कुटुंब नियोजनाचा भार कमी करणारी आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित पर्याय असल्याचे
आरोग्य विभागाने सांगितले आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा,
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment