सामाजिक बांधिलकी समजून शासकीय योजना राबवाव्यात - पालक सचिव शैला ए. · पालक सचिवांनी घेतला जिल्हास्तरीय आढावा
बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : केंद्र
व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना सामाजिक बांधिलकी समजून प्रभावीपणे राबवाव्यात,
अशा सूचना वित्त विभागाच्या सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव शैला ए. यांनी आज अधिकाऱ्यांना
दिल्या.
जिल्ह्याच्या पालक सचिव झाल्यानंतर त्या शुक्रवारी
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी विविध विभागांच्या
प्रमुख अधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरीय आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या आढावा
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मुख्य वनसंरक्षक
सरोज गवस, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, डॉ.
जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
मनोज ढगे यांचे सह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचा परिचय करून दिला त्यानंतर आढावा बैठकीला सुरुवात करण्यात
आली. या बैठकीत पालक सचिव शैला ए यांनी जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि
भौगोलिक क्षेत्राची माहिती घेतली. त्यानंतर जिल्ह्याची लोकसंख्या, विकास प्रकल्प, पर्यटनस्थळे, मुलींचा जन्मदर, शिक्षण, आरोग्य, पर्जन्यमान, अतिवृष्टी
व अवेळी पावसामुळे शेत नुकसान, पंचनामे आणि अनुदान वाटपायाची माहिती घेतली. त्यानंतर
त्यांनी जिल्ह्यातील पीक पेरणी क्षेत्र, फळ पिकांचे क्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग
वृक्ष लागवड, फळबाग लागवड, प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळ पिक विमा योजना, प्रधानमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार
निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जपुरवठा, पिककर्ज वाटप, कृषी पतपुरवठा, सावकारी कर्ज
वाटप, अग्रीस्टक, पीएम किसान निधी, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, समाधान
शिबीर, लोकशाही दिन, जिवंत सातबारा मोहीम, सेवा पंधरवडा अंतर्गत सर्वांसाठी घरे अभियान,
पाणंद रस्ते, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना, जलजीवन
मिशन, आयुष्मान भारत, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जिल्हा वार्षिक
नियोजन आराखडा, सिंचन प्रकल्प, भूसंपादन व पुनर्वसन, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, लोणार
सरोवर विकासाचा आराखडा आणि आगामी प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.
आढावा घेतल्यानंतर पालक सचिव शैला ए यांनी मार्गदर्शन
करताना प्रशासनाने चांगल्या पद्धतीने काम करावे, सर्व विभागांनी समन्वयाने शासकीय योजनांची
अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सादरीकरणाद्वारे बुलढाणा जिल्ह्याची माहिती सादर
केली.
000

Comments
Post a Comment