आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा : 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 185 कोटींचा मदतनिधी जमा


 

·         आतापर्यंत 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 350 कोटींची मदत वितरित

 

बुलढाणा, दि. 20 (जिमाका) :  सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकसानीपोटी मंजूर केलेला मदतनिधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी केवळ दोन दिवसांत 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण 185 कोटी रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

 

अतिवृष्टी आणि पूरामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे करून अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. शासनाने मंजूर केलेली रक्कम युद्धस्तरावर वाटप करण्याचे काम करण्यात आले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे.

 

यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध निर्णयांनुसार जुलैपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत वितरित करण्यात आली आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 350 कोटींपेक्षा जास्त मदतनिधी थेट शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आला आहे.

 

ॲग्रीस्टॅकअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढला नाही त्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जावून नोंदणी करुन फार्मर आयडी काढून घ्यावा. तसेच ॲग्रीस्टॅकअंतर्गत ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांसाठीही निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या