रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन: शेतकऱ्यांनी तयारीला लागावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 27 : रब्बी हंगाम सन २०२५-२६ साठी
कृषि विभाग सज्ज झाले असून लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हवामान, पाण्याची
उपलब्धता आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊन योग्य पीक नियोजनावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी तंत्र अधिकारी(विस्तार) अजय वाढे यांनी केले आहे.
जिल्हा
कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी 3 लाख 87 हजार 359 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे महत्त्वाकांक्षी
उद्दिष्ट ठेवले आहे, जे सरासरी 3 लाख 29 हजार 803 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक आहे.
हंगामात हरभरा 2 लाख 60 हजार 100 हेक्टर, गहू
78 हजार हेक्टर, मका 32 हजार हेक्टर आणि ज्वारी 16 हजार हेक्टर ही प्रमुख पिके राहणार
असून, शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करून नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यास सहकार्य करावे.
राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी प्रमुख पिकांचे प्रमाणित बियाणे
अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये हरभरा बियाणे (10 वर्षांच्या आतील वाण) :
2073.40क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन असून, 50 रुपये प्रति किलो अनुदान. हरभरा बियाणे
(10 वर्षांवरील वाण) : 2070 क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन असून 25 रुपये प्रति किलो
अनुदान. ज्वारी बियाणे (10 वर्षांच्या आतील वाण) : 40 क्विंटल बियाणे वितरण, 30 रुपये
प्रति किलो अनुदान. ज्वारी बियाणे (10 वर्षांवरील वाण) : 170 क्विंटल बियाणे वितरण,
15 रुपये प्रति किलो अनुदान. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या तालुका
कृषी अधिकारी कार्यालय किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही
आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी
पेरणीपूर्वी जमिनीची मशागत योग्य पद्धतीने करावी, तपासणी केलेले व उपचारित बियाणे वापरावे
आणि पीकसंरक्षण व खत व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे. रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी
कृषी विभागाने आखलेल्या नियोजनास सहकार्य करून अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी,
असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
0000
Comments
Post a Comment