अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय : व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

 

बुलढाणा, दि. 7 (जिमाका): आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनविण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. महामंडळ आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नव्हे, तर लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आवश्यक उद्योजकता प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील देणार आहे.

हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

या उपक्रमाचा भाग म्हणून महामंडळाच्या वतीने ‘उद्योग सारथी’ प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २४ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले. या वेबिनारमध्ये ‘पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय’ या विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम युट्युब आणि फेसबुकवर थेट प्रसारित करण्यात आला.

वेबिनारदरम्यान डॉ. माने यांनी दुग्ध व्यवसायातील यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी उत्तम जातीच्या जनावरांची निवड, आहार नियोजन, आरोग्य व लसीकरण, तसेच आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन तंत्र यावर सखोल माहिती दिली. तसेच, गीर, साहिवाल, जर्सी यांसारख्या देशी व विदेशी जातींचे फायदे, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन व व्यवस्थापनात होणारी सुधारणा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. माने यांनी सांगितले की, दुग्ध व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि शाश्वत व्यवस्थापनामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो.

या वेबिनारमध्ये राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका आणि स्वयंसहायता गट प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. लाभार्थ्यांनी थेट प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.

पुढील काळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून, तज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले उद्योजक आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे वाढवतील, असा विश्वास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या