शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत; पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;
पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 16: शिक्षक मतदारसंघासाठी मतदार
याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक
विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव
नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.
या
कालावधीत पात्र मतदारांनी आपली नावे नोंदवून घेणे अत्यावश्यक असून, कोणताही पात्र
मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची दक्षता स्वतः मतदारांनी घ्यावी. मतदार
नोंदणीसाठी पात्र व्यक्तींनी नमुना क्रमांक 19 मध्ये अर्ज सादर करावा. मतदार
नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (4) नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीशीची प्रथम
पुर्नप्रसिद्धी 15 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आली आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी
कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्या, नगरपरिषद
कार्यालये तसेच संबंधित संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासंबंधीचा
सविस्तर तपशील मुख्य निवडणूक अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी
प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment