सुधारित आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार
बुलढाणा, दि. 1 (जिमाका): युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) तर्फे जाहीर करण्यात आलेले सुधारित आधार सेवा दर 1 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व आधार केंद्रांवर लागू होणार आहेत. हे सुधारित आधार सेवा दर अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2028 पर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतुविभाग प्र. अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नवीन आधार नोंदणी तसेच 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे या आधार अनिवार्य वयोगटासाठी बायोमेट्रिक अद्ययावत हे मोफत राहणार आहेत. तर 7 ते 15 वर्ष वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतनसाठी आकारले जाणारे शुल्क 1 ॲाक्टोबरपासून एक वर्षासाठी माफ करण्यात आले आहे. त्यानंतर निश्चित दर आकारले जातील. तसेच 17 वर्षांपेक्षा जास्त वयोगटासाठी बायोमेट्रिक अद्ययावत करण्यासाठी 125 रुपये, एका किंवा अधिक क्षेत्राचा अर्थात डेमोग्राफिक अद्ययावत करण्यासाठी 75 रुपये, आधार नोंदणी केंद्राद्वारे पत्त्याचा पुरावा किंवा ओळखीचा पुरावा दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी 75 रुपये, तसेच ई-केवायसी किंवा आधार शोधून त्याची रंगीत प्रत घेण्यासाठी 40 रुपये शुल्क निश्चित केले आहे.
आधार केंद्रांना सुधारित सेवा दरांचे फलक केंद्रावर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबरपासून नागरिकांकडून केवळ निश्चित दरानुसार शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले असून, जास्त शुल्क आकारल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा प्रशासन याकडे लक्ष ठेवणार आहेत.
नागरिकांना आधार सेवांबाबत तक्रार असल्यास rdc_buldhana@rediffmail.com किंवा dpmbuldhana1@gmail.com या ई-मेलवर लेखी तक्रार सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment