अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत Ø 55 प्रकरणांत गुन्हे दाखल Ø 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण
बुलढाणा, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील
69 प्रकरणातील अवैध सावकारांकडील 74.27 हेक्टर आर शेतजमिन शेतकऱ्यांना परत करण्यात
आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॅा. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून होत असलेली पिळवणूक
रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू असून शेतकऱ्यांनी निर्भयपणे तक्रारी दाखल
कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी ‘दैनिक पुण्यनगरी’मध्ये “सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या
टोळ्या सक्रिय, चिखलीत गल्लीबाजार तेजीत, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध सावकारांना
बळ”
या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीचे खंडन करत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने
स्पष्ट केले की, अवैध सावकारी तक्रारींची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे करण्यात
येते.
शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,
2014 च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती
गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा पोलिस अधीक्षक सदस्य असून जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था हे सदस्य सचिव आहेत.
हा अधिनियम अंमलात आल्यापासून आतापर्यंत कलम 16 अंतर्गत
778 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली
आहे. तसेच कलम 18(2) अंतर्गत 401 तक्रारी प्राप्त झालेल्या असून 270 तक्रारी निकाली
काढल्या गेल्या आहेत, तर 131 प्रकरणे प्रलंबित आहेत. या अधिनियमांतर्गत आतापर्यंत
69 प्रकरणांत 74.27 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली असून 55 प्रकरणांत
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध सावकारांकडून पिळवणूक झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक,
सहकारी संस्था कार्यालयांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment