शेगांव तालुक्यातील केस गळती बाधीत गावांत आयसीएमआरचे पथक दाखल

 





शेगांव तालुक्यातील केस गळती बाधीत गावांत आयसीएमआरचे पथक दाखल

 

बुलढाणा, दि. 14(जिमाका) : शेगांव तालुक्यातील केस गळती बाधीत गावांत आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात दिल्ली आणि चेन्नई आयसीएमआरचे पथक दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या टिममधील तज्ज्ञांनी जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर या पथकामधील शास्त्रज्ञांनी केस गळती भागातील बाधीत रुग्णांशी संवाद साधून केस गळतीचे मुळ कारण शोधून प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते यांनी दिली.

 

या विशेष पथकामध्ये डॉ. मनोज मुन्हेकर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी चेन्नई), डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ सुमित अग्रवाल (आयसीएमआर, नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (आयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे), डॉ राज तिवारी (संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ), डॉ सुचित कांबळे (आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा या विशेष पथकामध्ये समावेश आहे.

 

तर 13 जानेवारीला आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक होमीओपॅथी संशोधन संस्था, नवी दिल्ली आणि केंद्रीय होमीओ परिषदेच्या शास्त्रज्ञांची टिम शेगांव तालुक्यात दाखल झाली आहे. यामध्ये युनानी होमीओपॅथी आणि आयुर्वेदिक तज्ञांचा समावेश असून डॉ हिंकल कौर, डॉ. प्रियंका सुर्यवंशी, डॉ. तेजस्वीनी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केस गळती गावातील रुग्णांशी चर्चा करुन माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि अॅलोपॅथीचे शास्त्रज्ञ केस गळती कारण शोधण्याचे काम करीत आहे.

 

केस गळती रुग्णांच्या आकडेवारीनुसार शेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोगय केंद्र भोनगाव अंतर्गत बोंडगांव येथे 23, कालवड  24, कठोरा 21, भोनगांव 8, मच्छिंद्रखेड 6, प्राथमिक आरोगय केंद्र जवळा बु.अंतर्गत हिंगणा वैजिनाथ येथे 5, घुई 8,तरोडा कसबा 13, प्राथमिक आरोगय केंद्र जलंब अंतर्गत माटरगांव 21, पहुरजिरा 32, निंबी 10, नांदूरा तालुक्यातील  प्राथमिक आरोगय केंद्र वडनेर भोलजी येथे वाडी गावात 7 असे एकूण 178 रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

000000

Comments