जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानास आरंभ

 

जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानास आरंभ

> 50 गट कार्यान्वित करण्यात येणार

>ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्याचे घोषित केले होते. त्यानुसार देशभरात 15 हजार नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार असून बुलढाणा जिल्ह्यात 50 गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्यामुळे या अभियानात ग्रामपंचायतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेत जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून इच्छुक १२५ शेतकऱ्यांना प्रती शेतकरी एक एकर क्षेत्रासाठी सहभागी करून घेण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकी दोन कृषी सखींची निवड करण्यात येणार आहे.  या कृषी सखींकडून इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज संकलित करून त्यांना नैसर्गिक शेती गटात समाविष्ट करतील.

नैसर्गिक पद्धतीवर आधारित स्थानिक पशुधन शेती पद्धती लोकप्रिय करणे, जमिनीचा पोत सुधारणे, बाहेरून निविष्ठा खरेदी कमी करून शेतावरच आवश्यक निविष्ठा निर्मिती करणे व त्याचा वापर वाढवणे, शेतमाल उत्पादनासाठीचा खर्च कमी करणे आणि सहभागी शेतकऱ्यांच्या शेतीचे नैसर्गिक शेती प्रमाणीकरण करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

ज्या ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांचे तालुका सनियंत्रण समिती अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांचे ग्रामपंचायतीची सहमती कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000000


Comments