मारहाणीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका – चाईल्ड हेल्पलाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई
मारहाणीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका –
चाईल्ड हेल्पलाईन व पोलिसांची संयुक्त कारवाई
बुलढाणा,दि.4
(जिमाका) : खामगाव रोडवरील लक्ष्मी हार्डवेअर जवळील रस्त्याच्या कडेला झोपडी करून राहणाऱ्या
पाच वर्षीय चिमुकलीवर तिची आजी आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने दारूच्या
नशेत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात चाईल्ड हेल्पलाईन १०९८,
जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा व चिखली शहर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत
बालिकेची सुटका करण्यात आली आहे.
बालिकेवर होत
असलेल्या अत्याचाराची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून
चाईल्ड हेल्पलाईनला मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिधुळे व जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक शेख सोहेल
व पर्यवेक्षक सागर नरवाडे घटनास्थळी पोहोचले.
तेथे तपासणीअंती
चिमुकलीवर तिच्या आजीने आणि एका पुरुषाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याचे निदर्शनास
आले. प्रकल्प समन्वयकांनी त्वरित चिखली शहर पोलिस स्टेशन व बाल कल्याण समिती, बुलडाणा
यांना माहिती देण्यात आली.
यानंतर पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाईल्ड
हेल्पलाईन व पोलिसांचे संयुक्त पथक त्वरित घटनास्थळी पोहचले. तीन तासांच्या शोधमोहीमेनंतर,
चिमुकली श्री. शिवाजी हायस्कूल बस स्थानक परिसरात आढळून आली.
बालिकेची सुटका
करून तिला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार,
तिच्या संरक्षणासाठी दि लव ट्रस्ट अनाथालय, बुलडाणा येथे दाखल करण्यात आले.
ही कारवाई यशस्वी
करण्यासाठी चिखली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, महिला पोलिस अंमलदार,
ड्युटी ऑफिसर गणेश मैंद यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही बाल कल्याण समिती, बुलडाणा
यांच्या माध्यमातून केली जात आहे.
0000
Comments
Post a Comment