राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे; जागतिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी कृषी विभागाचा उपक्रम; अर्ज करण्याचे आवाहन

 राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे; जागतिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी

कृषी विभागाचा उपक्रम; अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा,दि. 21 (जिमाका) : विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ जाणून शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून अभ्यास दौरे आयोजिण्यात येत आहेत.

योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना युरोप (नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स), इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स, चीन आणि दक्षिण कोरिया अशा प्रगत देशांमध्ये अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे.  योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक शेतक-यांनी दि. २4 जुलैपूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन कृषी उपसंचालक ए.बी. गावडे यांनी केले आहे. 

अभ्यास दौऱ्याचे उद्दिष्टे: उत्पादन व उत्पादकता वाढविणे,  शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, काढणीपश्चात प्रक्रिया व व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास,  जागतिक शेती व्यवस्थापन प्रणाली समजून घेणे,  निर्यातक्षम शेतीचा विकास.

देशनिहाय अभ्यासाचे क्षेत्र:  युरोप दौऱ्यामध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती, दुग्धोत्पादनातील आधुनिक पद्धतीचा अभ्यास,  इस्राईल दौऱ्यात पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण,  जपान दौऱ्यात सेंद्रिय शेती व उच्चतंत्र शेती पद्धती,  मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स दौऱ्यांत काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन,  चीन दौऱ्यात कृषी EXPO, उत्पादनवाढ तंत्रज्ञान, दक्षिण कोरिया दौऱ्यात आधुनिक अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाईल. या दौऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये शेतातील नवोन्मेषाबाबत जागरूकता निर्माण होईल. आधुनिक बाजार व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी आणि जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे ज्ञान वाढणार आहे.

पात्रतेचे निकष: अर्जदार स्वतः शेतकरी असावा,  अर्जदाराच्या नावावर मागील 6 महिन्यांचा ७/१२ आणि ८-अ उतारा असावा, शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन असावे, शेतकऱ्याकडे अँग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. फक्त एका कुटुंबातील एकाच सदस्यास या योजनेचा लाभ घेता येईल, आधार प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, दौऱ्यास निघण्याच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे, अर्जदाराकडे वैध पासपोर्ट असावा व त्याची मुदत किमान तीन महिने शिल्लक असावी. अर्जदार कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरीस नसावा, तसेच डॉक्टर, वकील, अभियंता, सीए, कंत्राटदार इत्यादी व्यवसायाशी संबंधित नसावा, यापूर्वी शासकीय खर्चावर परदेश दौरा केलेला नसावा.

आर्थिक सहाय्य: शासनामार्फत एकूण दौऱ्याच्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा कमाल 1 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य (अनुदान) दिले जाणार आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्याने स्वतः भरावा लागेल.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक शेतकऱ्यांनी प्रपत्र-१ मध्ये आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. जर पात्र अर्जांची संख्या लक्षांकापेक्षा अधिक झाली, तर जिल्हास्तरीय समितीमार्फत सोडत पद्धतीने निवड केली जाईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आणि कोरोना तपासणी अहवाल अनिवार्यपणे सादर करावे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या