अवयवदान चळवळ म्हणून राबवा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात 'अवयवदान पंधरवडा'

 

अवयवदान चळवळ म्हणून राबवा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात 'अवयवदान पंधरवडा'

 

बुलडाणा, दि. 30 (जिमाका):  राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढवून अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी राज्यभरात दि. ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान "अवयवदान पंधरवडा" उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी व्यापक जनजागृती आणि समाजाभिमुख मोहिम राबवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय नियोजन बैठकीत दिले.

या बैठकीत आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका डॉ. कादंबरी बलकवडे, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, "अवयवदान ही एक वैयक्तिक कृती नसून, ती सामाजिक बांधिलकी आहे. ही चळवळ जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी आणि भीती दूर करणारी असली पाहिजे. लोकांमध्ये सकारात्मक मतपरिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रभावी जनजागृती अत्यावश्यक आहे."  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि आरोग्य संस्थांमध्ये या मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयवदात्यांचा गौरव करून मोहिमेला प्रेरणादायी स्वरूप द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत जनतेमध्ये असलेले गैरसमज, भीती व अंधश्रद्धा दूर करून, याबाबतचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय आधार स्पष्ट करण्यावर भर देण्यात येईल. यामध्ये शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. अवयवदानास प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या (ROTTO/SOTTO) यांना या कालावधीत विशेष मार्गदर्शन दिले जाईल. प्रत्येक आरोग्य यंत्रणेकडून मोहिमेचा नियमित आढावा घेण्यात येणार असून राज्याला अवयवदानात आघाडीवर नेणे हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.

या पंधरवड्यात विविध माध्यमांतून प्रचार व प्रसार, जनजागृती रॅली, चर्चासत्रे, हेल्थ टॉक्स, अवयवदात्यांचे अनुभव कथन यांचे आयोजन करण्यात येणार असून राज्य शासनाने हे पाऊल जनतेच्या सक्रिय सहभागाने यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या