एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार
ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान
33.50 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास
मंजुरी ;
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा- मनोजकुमार ढगे यांचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 4: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक
सूचनानुसार एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत औषधी व वनस्पती लागवड हा घटक नव्याने
समाविष्ट करण्यात आला असून याअंतर्गत 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार
आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे
आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
केंद्र पुरस्कृत औषधी
वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेअंतर्गत 2015-16 पासून राष्ट्रीय
आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ मार्फत राबविण्यात
येत होता. सदर योजनेअंतर्गत सन 2015-16 ते 2019-20 या कालावधीमध्ये 818.23 हेक्टर क्षेत्रावर
औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आलेली असून त्याकरिता रक्कम 415.12 लाख रुपये एवढे अनुदान
अदा करण्यात आलेले आहे. तथापि सन 2020-21 पासून औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष
अभियानाचा घटक नसल्याचे तसेच सन 2021-22 पासून औषधी वनस्पती लागवड योजना बंद करण्यात
आली असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. हा घटक आयुष मंत्रालयाकडून कृषी मंत्रालयाकडे
हस्तांतरित करण्यात आला आहे.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर
व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड किंवा वृक्ष लागवड व फुलपिक लागवड कार्यक्रम राबवण्याबाबत
राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये अर्जुन, असान, अशोका,
बेहडा, हिरडा, बेल, टेटू, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आईन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा
व करंज या 16 वृक्षवर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान देय आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास
अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये औषधी व वनस्पती लागवड हा घटक
नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र
शासनाने सन 2025-26 मध्ये रक्कम 33.50 लाख रुपये एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास
मंजुरी दिलेली आहे. औषधी व सुगंधी वनस्पतीचे पीक निहाय आर्थिक मापदंड ठरविण्यात आले
आहेत.
वनस्पतीचे कोणत्या ?
औषधी वनस्पती :- जेष्ठमध/मुलेठी,
शतावरी, कालिहारी/कळलावी सफेद मुसळी, गुग्गुळ, मंजीष्टा, कुटकी, अतिस जटामासी, अश्वगंधा,
ब्राम्ही, तुलसी, विरादीगंध, पिंपळी, चिराठा पुष्कर मूळ
मापदंड : रु 1.50 लाख
प्रति हेक्टर,
देय अर्थसहाय्य प्रति
हेक्टर: सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये 40% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50% अर्थसहाय्य.
लागवड साहित्य व आयआयएम किंवा आयपीएमचा खर्च दोन हप्त्यामध्ये (2 हेक्टर च्या मर्यादित)
महाग सुगंधी वनस्पती
:- गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाइल, चंदन, दवणा, जाई, लव्हेंडर
मापदंड : रु 1.25 लाख
प्रति हेक्टर,
देय अर्थसहाय्य प्रति
हेक्टर: सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये 40% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50% अर्थसहाय्य.
लागवड साहित्य व आयआयएम किंवा आयपीएम चा खर्च दोन हप्त्यामध्ये (2 हेक्टर च्या मर्यादित)
इतर सुगंधी वनस्पती
:-पामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटीव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशी पत्र
मापदंड : रु 50 हजार
प्रति हेक्टर,
देय अर्थसहाय्य प्रति
हेक्टर: सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये 40% आणि अधिसूचित क्षेत्रामध्ये 50% अर्थसहाय्य.
लागवड साहित्य व आयआयएम किंवा आयपीएमचा खर्च
दोन हप्त्यामध्ये (2 हेक्टर च्या मर्यादित)
औषधी व सुगंधी वनस्पती
लागवड करू इच्छिणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर
फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार
ढगे यांनी केले आहे.
“सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज
करावेत. आपला जिल्हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीत अग्रेसर व्हावा, यासाठी
प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील.” - जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील,बुलढाणा.
००००
Comments
Post a Comment