अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

 

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

बुलढाणा,दि.25(जिमाका) : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी सन 2025-26 शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मंजूरी दिली आहे. सन 2025-26 वर्षासाठी जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दि. 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 1 ऑगस्ट 2025 पर्यंत https://fs.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट पोस्टाने किंवा समक्ष आयुक्त, समाज कल्याण, 3, चर्च पथ, पुणे 411001 येथे सादर करावी, असे अवाहन पुणे समाज कल्याण विभागाचे आयुक्तांनी केले आहे.

योजनेच्या अटी व शर्ती: विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी अल्पसंख्याक समुदायातील घटकातील असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडीसाठी 40 वर्षे ही कमाल वयोमर्यादा असावी. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबत सक्षम प्राधिकारी तथा तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.) परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे (दिनांकानुसार) कालावधीचाच एमबीए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. एका वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत एका कुटूंबातील दोन पाल्यांचा समावेश असल्यास प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीत जागा रिक्त राहील्यास एका कुटूंबातील दुसऱ्या पाल्यास लाभ देण्यात येईल. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी साठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतीक क्रमवारीत 200 च्या आत असावी. तथापी 200 मधील The University of South Wales (UNSW Sydney), Australia हे विद्यापीठ सदरील योजनेतुन वगळण्यात येत आहेत. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

योजनेतील लाभाचे स्वरुप : परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गानी Economy Clasa विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहीत केलेल्या वित्तीय मर्यादेत मूळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इ. तपासून विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजिकच्या मार्गाने Economy Class विमान भाडे, परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तीक आरोग्य विमा यासह शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या