शालार्थ प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करण्याचे निर्देश

 


शालार्थ प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करण्याचे निर्देश

 

बुलढाणा, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीत आपल्या संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती अद्यावत करावी, असे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत.

 

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शासन निर्णय 7 नोव्हेंबर 2012 अन्वये शालार्थ या प्रणालीद्वारे अदा केले जातात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मुख्याध्यापकांनी त्यांच्या लॉगिनवरून अपलोड करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांनी नुकत्याच घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचा आढावा घेतला होता.

 

याबाबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, प्राथमिक वेतन पथक अधीक्षक पंकज गवई, सुभाष थोंबाळे तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

 

शिक्षणाधिकाऱ्यांनी 7 नोव्हेंबर 2012 ते 7 जुलै 2025 या कालावधीतले वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश, संस्थेचे नियुक्ती आदेश आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे रुजू अहवाल ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात 13 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार शाळांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. अद्याप तीन शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याने त्यांनी ते तातडीने बसवावेत, असेही निर्देश देण्यात आले.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती 1981 अधिनियम, बिंदू नामावलीची प्रमाणितीकरण प्रक्रिया, तसेच शिक्षकांना दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करण्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 20 ऑगस्टपर्यंत सर्व शाळांनी बिंदू नामावली विभागाकडे सादर करणे आवश्यक असून 30 ऑगस्टपर्यंत दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करून अहवाल सादर करावा लागेल. तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठीत करणे, तक्रार पेटी बसवणे, नियमित बैठकांचे आयोजन करणे या बाबींचेही पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या