बुलढाण्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ निवडीसाठी नवी जिल्हास्तरीय समिती गठित
बुलढाणा, दि.28 (जिमाका.) : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन
निर्णय दि. 20 जून 2025 अन्वये यावर्षी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली होती.
मात्र, ते आदेश रद्द करून आता नवीन समिती गठित करण्यात आली आहे.
नवीन समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार हे असतील.
या समितीमध्ये सदस्य म्हणून पोलिस उप अधिक्षक बाळकृष्ण पावरा, जिल्हा आरोग्य अधिकारी
अमोल गीते, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई, जिल्हा माहिती अधिकारी
पवन राठोड, जिजामाता महाविद्यालयाचे संगीत
शिक्षक प्रा. गजानन लोहाटे, शिल्पकला विभागाचे डॉ. विकास पहुरकर यांचा समावेश करण्यात
आला आहे. तर जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार
हे या समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत.
समितीची कार्ये : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्राप्त झालेले
परीक्षण अहवाल, छायाचित्रे, चलचित्र व कागदपत्रांच्या आधारे शासन निर्णय दि. 20 ऑगस्ट
2025 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुणांकन करणे व प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या
मंडळांची निवड करून जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करणे. गणेशोत्सव मंडळांना उत्सवस्थळी
प्रत्यक्ष भेट देऊन परीक्षण करणे. शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन
करणे हे या समितीचे कार्य असणार आहे.
या समितीच्या निवडीवरून यावर्षीच्या बुलढाणा जिल्ह्यातील उत्कृष्ट
गणेशोत्सव मंडळांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे.
Comments
Post a Comment