आर्थिक साक्षरतेसाठी मेहकर येथे आर्थिक समावेशन कार्यक्रम; रि-केवायसी, विमा व योजनांवर तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन
बुलढाणा, दि. 28 (जिमाका): ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक
साक्षरता वाढविण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने वेदिका लॉन, मेहकर येथे ग्रामपंचायत
स्तर आर्थिक समावेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रिझर्व्ह बँक
ऑफ इंडिया (आरबीआय), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच विविध वित्तीय
संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तज्ज्ञांव्दारे रि-केवायसी, विमा व शासनाच्या विविध योजनावर मार्गदर्शन करण्यात
आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आरबीआय नागपूर उप महाव्यवस्थापक अंजना शामनाथ यांनी
भूषविले. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पुणेचे अंचालिक प्रबंधक अजय कुमार सिंग प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकोला क्षेत्रीय प्रमुख
पंकज कुमार, स्टेट बँक ऑफ इंडिया, बुलढाणा क्षेत्रीय प्रमुख नीरज कुमार, आयसीआयसीआय
बँक अंचालिक प्रबंधक विवेक बल्की, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, जिल्हा उद्योग केंद्र
महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, नाबार्ड रोहित गडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक कौशलेन्द्र
कुमार सिंग आदी उपस्थित होते.
अंजना शामनाथ यांनी रि-केवायसीचे महत्त्व अधोरेखित करत प्रधानमंत्री जीवन ज्योती
विमा योजना (पी.एम.जे.जे.बी.वाय), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पी.एम.एस.बी.वाय)
आणि अटल पेन्शन योजना (ए.पी.वाय) याबाबत सविस्तर माहिती दिली. डिजिटल बँकिंगमधील सायबर
सुरक्षा व सुरक्षित व्यवहारांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.
अजय कुमार सिंग यांनी सांगितले
की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही प्रधानमंत्री जनधन योजना (पी.एम.जे.डी.वाय) व अन्य योजनांच्या
अंमलबजावणीत आघाडीवर असून, ग्रामीण भागात जागरूकता व नोंदणीसाठी प्रयत्नशील आहे. पंकज
कुमार यांनी आर्थिक समावेशन ग्रामीण विकासाचे बळ असल्याचे नमूद केले, तर कौशलेन्द्र
कुमार सिंग (एलडीएम बुलढाणा) यांनी बँकांच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक करत जिल्ह्यातील
नागरिकांना थकीत रि-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाअंतर्गत 19 ऑगस्ट रोजी 9 हजार 987 रि-केवायसी तर 20 ऑगस्ट रोजी 8 हजार
569 रि-केवायसी पूर्ण झाल्याची मोठी उपलब्धी नमूद करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान विविध
शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले.
मेहकर व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी
ठरला. आर्थिक साक्षरता व समावेशनाच्या दिशेने ग्रामीण भागासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल
असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
00000
Comments
Post a Comment