लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावामुळे बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

 

लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावामुळे बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन

बुलढाणा,दि.18 (जिमाका):   जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असल्याने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दि. 22 ऑगस्ट रोजीचा बैलपोळा सण साधा व घरगुती पद्धतीनेच साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आली असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांना प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  शुक्रवार दि. 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे. या दिवशी बैल एकत्र करून सण साजरा केल्यास किंवा शर्यतींचे आयोजन झाल्यास लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी साध्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसेच हा अनुसूचित रोग असल्यामुळे प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय, निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाहीत दिरंगाई किंवा अडथळा आढळल्यास प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 31, 32 व 33 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याची सर्व संबंधित विभागांनी तसेच पशुपालकांनी गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या