गणेशोत्सव उत्साहात साजरा करा पण, नियम जाणून घ्या ; काय करावे आणि काय करू नये?

 

गणेशोत्सव उत्साहात साजरा करा पण, नियम जाणून घ्या ;

 काय करावे आणि काय करू नये?

Ø  लेखी परवानगी आवश्यक

 

बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शहरात, गावात, खेड्यात सार्वजनिक रस्त्यावर अगर रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्या हेतुने गणेशोत्सवानिमित्त होणारे मेळावे, दिंडी अगर मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांचे नियमनाकरीता मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33,37 व 40 प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत, याबाबतचा जाहीरनामा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी  जारी केला आहे.

जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत (दोन्ही दिवस धरुन) कोणासही श्री गणपती स्थापने प्रित्यर्थ अगर विर्सजना प्रित्पर्य मेळावे किंवा पालख्या किंवा वाद्यांसहीत मिरवणूक काढावयाची झाल्यास, अगर नाचगाणे किंवा कुस्त्यांचे सामने करावयाचे असल्यास त्या व्यक्तीने संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडुन लेखी परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. अशी लेखी परवानगी घेतल्याशिवाय गणेशोत्सव कालावधीत कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. प्रेत यात्रेला मात्र नियम लागू राहणार नाही.

परवानगीसाठी अर्ज कसा व कुठे करायचा :

ज्यांना परवाने पाहिजे असतील त्यांनी अशी मिरवणूक काढावयाच्या अगोदर लेखी अर्जाद्वारे संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदार यांच्याकडे विहित नमुन्यात माहिती भरुन देणे आवश्यक आहे. या लेखी अर्जात मुख्य आयोजकाचे पूर्ण नाव व पत्ता, ज्या कारणासाठी परवाना पाहिजे ते कारण, मेळावा अगर मिरवणूकीचे वर्णन व मंडळाचे नांव, कोणकोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे तो तारीख व वेळ, ज्या रस्त्याने मिरवणूक अगर मेळावा जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे ती तारोख व वेळ, मिरवणूक चालकाचे व सदस्यांचे पूर्ण नाव व पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणूकीतील किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वतः जबाबदार आहे असे अर्जावर लिहून दिले पाहीजे. मिरवणूकीत वापरावयाचे वाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा यांचेकडून तपासून घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल. अशा प्रकारची मिरवणूक अगर मेळावा सार्वजनिक जागेतून नेतांना संबंधित व्यक्तीजवळ असा परवाना असावयास पाहिजे व दंडाधिकारी अगर पोलीस अंमलदार यांनी तो पहावयास मागीतल्यास त्यांना दाखवणे बंधनकारक राहणार आहे.

ü  काय करावे :

श्री गणपती विर्सजनाचे दिवशी मिरवणुक अगर मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात नमुद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने त्यांना जावू दिले जाणार नाही व वहीवाट अगर इतर सबब ऐकली जाणार नाही. त्या मिरवणुकीमुळे इतर मिरवणूकीस अगर रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. अडथळा झाला तर त्याबद्दल तो मुख्य आयोजक जबाबदार धरला जाईल. मिरवणूक विर्सजन वेळेच्या आत केले पाहीजे. कोणत्याही प्रसंगी मिरवणूक अथवा मेळावा ह्यांनी प्रेतयात्रेला वाट दिली पाहीजे.

X काय करु नये :

व्यक्ती, प्रेत अगर त्यांच्या प्रतीमा यांचे सार्वजनिक जागेत प्रदर्शन करण्यास मनाई आहे. गणेशोत्सवाच्या काळात सभ्यता अगर नितिमत्तेत बिघाड होईल किंवा कायद्याविषयी तिरस्कार निर्माण होईल किंवा निरनिराळया जमातीतील शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य किंवा गैरवर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जातीय तंटे, बखेडे निर्माण होतील अगर निरनिराळ्या भागात किंवा जमातीत संघर्ष निर्माण होईल असे कोणतेही कृत्य भाषण, जाहीरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच विभत्स शब्दांचा उच्चार करु नये किंवा विभत्स सोंग आणू नयेत. कोणास अपमानकारक चिड येण्यासारखे किंवा असे कोणतेही कृत्य करु नये व शांततेचा भंग होईल अशा प्रकारच्या घोषणा करु नये, अगर गैरशिस्त गोंगाट करु नये. ज्याचे बरोबर वाद्य साहित्य, खेळ, दिंड्या, आखाडे, सोंग फलके आहेत अशा लोकांनी रस्त्याने जातांना आजूबाजूस राहणाऱ्या लोकांना त्रास होईल अशा रितीने थांबू नये, अगर गाणे गावू नये आणि ज्यावेळी एखादे जनावर बुजाडण्याचा संभव असेल त्या त्या वेळी अशी जनावरे तेथून निघून जाईपर्यंत वाद्य वाजविणे एकदम बंद ठेवले पाहीजे.

मेळावे किंवा मिरवणुकीत घ्यावयाची काळजी :

मशीद जवळून मिरवणूक जातांना मशीदीपुढे न थांबता पुढे निघून जावे, रंगाळू नये. मेळावे किंवा मिरवणुक रस्त्याने जात असता किंवा रस्त्याने मेळाव्यातील मुले पदे म्हणू लागली असता अगर रस्त्याने काही वेळ पर्यंत मेळाव्यास उभे राहणे भाग पडले असता मेळाव्याचे अगर मिरवणूकीच्या मुख्य आयोजकाने रस्त्यावरुन गाडी वगैरे वाहनास अडवळा होणार नाही अशी तजविज केली पाहीजे असा अडथळा झाला तर त्या बद्दल तो मुख्य आयोजक जवाबदार धरला जाईल. मेळावा अगर मिरवणूक रस्त्याने जात असतांना त्यातील कोणत्याही इसमाने विशेष परवाण्याशिवाय कोणतेही अग्नीशख, मशाल (टेंभे), तलवार, खंजीर, कट्यार चाकू, काठ्या, वांबू, छोटे दगड, गोफन अगर कोणत्याही प्रकारचे शस्त्र अगर ज्या योगे दुखापत करता येईल असे कोणतेही शस्त्र किंवा पदार्थ घेवून जावू नये अथवा जवळ बाळगू नये ज्यांचे जवळ असे शस्त्र किंवा वस्तू सापडतील त्यांचे जवळून ते घेवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात येतील.

हा जाहिरनामा अंमलात आला असून संबंधितांनी पाळावा. या जाहिरनाम्यातील कोणत्याही शर्तीच्या विरुध्द गुन्हा करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 चे कलम 135, 152 आणि भारतीय नागरिक न्याय संहीता 2023 प्रमाणे सुध्दा खटला भरण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

गणेशोत्सव शांततेत आणि सामंजस्याने साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

"गणेशोत्सव हा आनंदाचा आणि श्रद्धेचा सण आहे. यंदाच्या  गणेशोत्सवाला राज्य महोत्सवहा दर्जा देण्यात आला आहे. हा महोत्सव शांततेत आणि सामंजस्याने साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे," असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या